“आडवा आणि जिरवा” करणाऱ्यांना जनताच आगामी निवडणूकीत उत्तर देणार – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील औंध-रावेत हा बीआरटीएस रस्त्याच्या काही भागाचे काम १० वर्षापुर्वी तर काही भागाचे काम सुमारे ६ वर्षापुर्वी करण्यात आलेले आहे. दरम्यान १० वर्षापासुन ते आज अखेर या रस्त्यावर विविध विकास कामांमुळे बरीच स्थितंतर झालेली आहेत. या रस्त्याच्या बाजुने एमएनजीएलची गॅस वाहिनी तसेच तत्सम वेगवेगळ्या युटीलीटी देण्यात आलेल्या आहेत. यामुळे या रस्त्याच्या बाजुला असलेला फुटपाथ पुर्णत: नष्ट झालेला आहे. याच रस्त्यावर औंध ते डांगे चौका दरम्यान पिंपळ निलख येथे जाण्यासाठी अंडरपास, पार्क स्ट्रीट येथे जाण्यासाठी अंडरपास, जगताप डेअरी येथील उड्डान पुल यासारखी विविध विकास कामे करण्यात आलेली आहे. पर्यायाने ही कामे करत असताना रस्ता रुंदीकरण करणे, स्ट्रॉमलाईन टाकणे व यावरील चेंबर करणे तसेच रस्त्याचा उतार पाणी जाण्याच्या दिशेने करणे, रस्त्यालगतचे चेंबर रस्त्याच्या समपातळीवर करणे इ. कामे करणे अत्यंत आवश्यक आहे, असे पक्षनेते नामदेव ढाके यांनी म्हटले आहे.
वास्तविक पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करत असताना पुणे शहराकडुन औंध मार्गे शहरात प्रवेश करत असताना हा रस्ता प्रामुख्याने शहराच्या दर्शनी भागात येतो. त्यामुळे हा रस्ता पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर टाकणारा प्रमुख मोठा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचे सुयोग्य नियोजन करुन रस्ता विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सन २०२० मधये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातुन स्ट्रीट्स फॉर पीपल चँलेज हा उपक्रम राबविण्यात आला होता यामध्ये देशभरातील ११३ शहरांमधुन पिंपरी चिंचवड शहराची सर्वोच्च पुरस्कार यादीत पहिल्या ११ शहरांमध्ये नुकतीच निवड झालेली आहे. या उपक्रमामध्ये प्रामुख्याने शहरामध्ये देण्यात येणाऱ्या रस्ते सुविधांचा विचार करण्यात आलेला आहे.
औंध-रावेत या बीआरटीएस रस्त्याच्या विकसनाबाबत आरोप करण्यापुर्वी ज्यांनी ज्यांनी या रस्त्याची पहाणी केली त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधुन पहाणी केली की काय ? अशी दाट शक्यता वाटते. या ५ वर्षांमध्ये कसल्याही प्रकारचा दुजाभाव न करता वाकड, सांगवी या भागामधील विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. असे असतानाही या ठिकाणी विकास कामे अडवुन ठेवायची व दुसऱ्या बाजुला शहरातील इतर भागातील विकास कामांबाबत नाहक प्रश्नचिन्ह उभे करुन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न आरोप करणारी मंडळी करत आहे. कोरोना काळात शहरातील परवानाधारक रिक्षाचालक, पथविक्रेते, घरेलू कामगार, बांधकाम मजुर, चर्मकार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे वाहनचालक, जिम ट्रेनर, लोक कलावंत आणि बँड पथक या घटकांना र.रु. ३,०००/- (र.रु. तीन हजार फक्त) आर्थिक सहाय्य करणेची योजना, गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी टॅब, गणवेश, शुज, दप्तर व रेनकोट देण्याची योजना यासारख्या योजनांसाठी विरोध करुन त्या थांबविण्याचे पाप याच मंडळींनी केले आहे.
खर तर महानगरपालिकेमध्ये आम्ही जनतेतुन निवडून आलेलो असुन या ५ वर्षामध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही जनतेच्या अपेक्षांचा विचार करुन लोकाभिमुख कामांना प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे या ५ वर्षात महापालिकेला वेगवेगळे पुरस्कार देखिल प्राप्त झालेले आहेत. आणि या कामाच्या जोरावरच व सर्व घटकांना बरोबर घेवुन जनतेच्या आशिर्वादाने महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपाचीच सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे. इलेक्शन फंडची आम्हाला गरज नसुन खऱ्या अर्थाने विकासकामे अडवुन ठेवणाऱ्या आणि खोटे आरोप करणाऱ्यांच इलेक्शन फंडची गरज पडणार आहे. विकास कामांच्या संदर्भात “आडवा आणि जिरवा” हे कशासाठी करायचे आणि याच्या मागचा सुप्त हेतु काय ? हे वाकड मधील जनतेने गेल्या ५ वर्षात चांगलेच ओळखलेले आहे. तीच जनता महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीत त्यांना उत्तर देणार आहे. असे प्रत्युत्तर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिले आहे.