भाजपाला धक्क्यावर धक्के, नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपळे निलख येथील भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आज आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. नगरसेवक वसंत बोराटे, चंदा लोखंडे यांच्यानंतर भाजपाला हा तिसरा धक्का बसला आहे.
सर्वात आधी भोसरी विधानसभेतून बंडखोरीला सुरूवात झाली. नगरसेवक रवी लांडगे यांच्यानंतर नगरसेवक संजय नेवाळे यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका जाहीर केली. नंतर नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहाटे मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेविका चंदा लोखंडे यांनी देखील राजीनामा दिला. तर, आज नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
कामठे हे 2017 च्या निवडणुकीत निवडून आल्यापासून भाजपाच्या चुकीच्या कामाला कायम विरोध करत आले आहेत. कचरा, पाणी, डॉक्टर व कर्मचारी भरती यासह बेकायदेशीर घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. त्यावेळी भाजपाच्या वरीष्ठ स्तरावरून त्यांच्यावर अनेकवेळा दबाव आणला गेला. त्याला न जुगारता त्यांनी लोकांच्या बाजुने आपली भूमिका कायम घेतली. भाजपात राहून भाजपा नेत्यांच्या विरोधात त्यांनी काम केल्यामुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत.