स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती राष्ट्रभक्तीसाठी प्रेरणादायी
पिंपरी (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, राष्ट्रभक्तीसाठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार रुजवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे मत व्याख्याते शरद पोंक्षे यांनी सोमवारी (दि. 28) निगडी प्राधिकरण येथे मांडले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मसमर्पण दिनानिमित्त आयोजित ‘सावरकर विचार दर्शन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री राधिका देशपांडे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप सरचिटणीस विजय शिनकर, नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.
शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जिवनातील विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांच्या जिवनात शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कार्याचा असलेला वैचारिक पगडा ते स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीची विविध उदाहरणे मांडली. अहिंसा आणि शस्त्राचे महत्व यावरही त्यांनी भाष्य केले. स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी, अश्पृश्य़ता निवारणासाठी कार्य केले. त्यांची देशभक्तीची अनेक उदाहररणे आहेत. परंतु, देशात काही मंडळींनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी समाजात असंतोषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्दरंग साहित्य कट्टा कलाकारांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे “जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे” हे गीत आणि शिवरायांची तयार केलेली आरती सादर केली. त्याचे निवेदन ज्योती कानेटकर यांनी केले. प्रास्ताविक शर्मिला बाबर यांनी केले. चंद्रशेखर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.