पिंपळे सौदागर : जागतिक महिला दिनानिमित्त लतादीदींची आठवण
- पिंपळे सौदागरमध्ये लतादिदींच्या गीतांची रंगणार मेहफील
- विविध क्षेत्रातील महिलांचा ‘उन्नती महिला रत्न’ पुरस्काराने होणार सन्मान
- उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांचा पुढाकार
पिंपरी (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरात शनिवारी (दि. ५) दिवंगत लतादिदी मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. त्यांनी गायलेल्या अजरामर गीतांचे सादरिकरण करून महिला दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा ‘उन्नती महिला रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ उद्यान येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात महापौर उषा उर्फ माई ढोरे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व विविध मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण “माझी तुझी रेशीम गाठ’’ फेम प्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बहेरे, सा-रे-ग-म-प फेम अजित विसपुते, प्रसिद्ध पार्श्वगायिका राधिका अत्रे, कथक नृत्यांगना प्रिया बिरारी, तर संकल्पना निवेदक शोभा कुलकर्णी आहेत. महिलांसाठी खास लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक ११ विविध रंगांच्या पैठणी साड्यांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय विविध वयोगटातील मुलांसाठी डान्स स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणा-या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. जास्ती जास्त महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी केले आहे.