निष्ठावंत उमा खापरेंना संधी, गद्दारांनी वाजवली टिमकी

  • खापरे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर
  • पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांना वरिष्ठांचा धक्का

पिंपरी | विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून जाणिवपूर्वक डावलण्यात आलेल्या उमा खापरे यांची संयमी भूमिका अखेर फायदेशीर ठरली आहे. त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी घेतलेल्या कष्टाची परतफेड म्हणून उच्च स्थरावरून खापरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील व पक्षातील विविध पदांसाठी कायम आपल्याच बगलबच्च्यांचा विचार करणा-या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

उमा खापरे या भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या राहिल्या आहेत. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांनी मुंडे यांच्या विचारसरणीतील कार्यकर्त्यांची त्यांनी एकजूट बांधली. त्यांनी शहरातच नव्हे तर प्रदेशावर देखील पक्षवाढीचे काम केले आहे. त्यांच्या कामाच्या जोरावर याच पिंपरी-चिंचवडकरांनी त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दोनदा निवडून दिले होते. दोनवेळा नगरसेविका म्हणून त्यांनी महापालिकेचा कारभार गाजवला. 2001-02 च्या कार्यकाळात महापालिकेत आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी स्वतःची छाप पाडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी त्यांनी खूप काही केले असताना देखील 2017 च्या निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले. स्थानिक नेत्यांनी स्वताच्या बगलबच्च्यांची व्यवस्था करण्यासाठी खापरे यांचे तिकीट कापले. मोदी लाटेमुळे महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर त्यांना क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग सदस्य म्हणून सुध्दा संधी देण्याचा या नेत्यांनी विचार केला नाही. कायम निष्ठावंतांची पंखं छाटण्याचा उद्योग पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनी केला.

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सुध्दा खापरे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्तीचे एखाद्या जागेवर पुनर्वसन करण्याचा विचार केला नाही. एवढे स्वार्थी राजकारण झालेले असताना देखील खापरे यांनी कोणावर नाराजी व्यक्त न करता पक्षाचे काम करण्याला प्राधान्य दिले. स्थानिक नेत्यांच्या घाणेरड्या राजकारणाला वैतागून भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सारिखा पवार यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु, खापरे यांनी पक्षात राहूनच वरीष्ठ पातळीवर काम करण्याची संधी सोडली नाही. त्यांच्या कामाची दखल घेवून वरीष्ठ पातळीवरून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांना आमच्यामुळे संधी मिळाल्याची टिमकी काही स्थानिक नेत्यांकडून वाजवली जात आहे, असे वातावरण दिसत आहे.

भाजपात निष्ठेला किंमत

भाजपाने निष्ठावंतांना कायमच प्रथम प्राधान्य दिले आहे. राज्यसभा मा. खासदार अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीचे मा. अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे मा. अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मा. अध्यक्ष सदाशीव खाडे यांना वरीष्ठ स्तरावरून संधी देण्यात आली. त्यांनी भाजपासोबत ठेवलेली निष्ठा हिच त्याला कारणीभूत ठरते. त्यांना ही पदे स्थानिक नेत्यांमुळे मुळीच मिळालेली नाहीत.

महापालिकेतही संधी

मा. उपमहापौर शैलजा मोरे, केशव घोळवे, मा. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, स्थायी समितीचे मा. सभापती विलास मडिगेरी यांना निष्ठावंत म्हणून संधी मिळालेली आहे. परंतु, उमा खापरे यांचे महापालिका निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही. शिवाय, त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी देखील संधी देण्याचा विचार स्थानिक नवीन नेत्यांनी केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या सत्ताकाळात त्यांच्यावर कायमच अन्याय झाला. आता वरीष्ठ स्तरावरून त्यांना विधान परिषदेची संधी देण्याचा विचार झाल्याने स्थानिकांच्या डोळ्यात अंजन पडले आहे.

Share to