संभाजीनगर, शाहूनगरमधील विकासकामांचे फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 10 संभाजी नगर शाहूनगर, मोरवाडी येथे गेल्या पाच वर्षांमध्ये विकास कामांचा उच्चांक गाठला असून या सर्व विकास कामांनीचे उद्घाटन रविवारी (दि. 6) माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड मनपाच्या शहर सुधारणा समितीच्या सभापती अनुराधा गोरखे यांनी दिली आहे.

बर्ड व्हॅली मधील फाउंटन शो, केएसबी चौक येथील कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारक, शिव शाहू शंभो उद्यान संभाजीनगर विरंगुळा केंद्र, मोरवाडी म्हाडा राजश्री शाहू उद्यान शाहूनगर, त्याचबरोबर चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद व क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारक सुशोभीकरण अशी अनेक कामे प्रभागात पार पडली आहेत. या विकास कामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

प्रभागात रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे, २४ बाय ७ पाणी पुरवठा व इतर सुविधाही गेल्या पाच वर्षात पार पडल्या, याच बरोबर मोरवाडी येथे दिव्यांगांसाठी प्रशिक्षण केंद्र तसेच केएसबी चौक येथे शाहू सृष्टी, संभाजी नगर बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, मोरवाडी ऑटॉक्लस्टर येथील सायन्स पार्क अशी अनेक प्रभावी कामे गेल्या ५ वर्षात मार्गी लावली आहेत. याचबरोबर दत्तनगर विद्यानगर लाल टोपी नगर या परिसरातही तेथे कमानी टाकने, इंटरनल रोड, सीसीटीव्ही बसविणे व सार्वजनिक स्वच्छतागृहे यासारखी कामे मार्गी लागली आहेत, असे गोरखे म्हणाल्या.

Share to