पार्किंग पॉलिसी पुन्हा प्रभावीपणे राबविणार, आयुक्तांचे आदेश

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने बंद केलेली पार्कींग पॉलिसी 21 मार्चपासून प्रभावीपणे आमलात आणली जाणार आहे. यासंदर्भात वाहतूक नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड यांनी आदेश काढला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात प्रमुख रस्त्यांवर 1 जुलै 2021 रोजी पार्किंग पॉलिसी आमलात आणली. सुरूवातीला ही पॉलिसी प्रभावीपणे राबविण्यात आली. पार्किंग पॉलिसीसाठी निर्धारित केलेल्या जागेत वाहने लावल्यानंतर शूल्क वसुल करण्यात आले. मात्र, त्यामुळे नागरिकांची नाराजीही ओढवून घ्यावी लागली. नागरिकांमधून नाराजी वाढल्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी तुर्तास ही पॉलिसी बंद करण्याचे आदेश दिले होते.

आता ही पार्किंग पॉलिसी 21 मार्च 2022 पासून पुन्हा नव्याने राबविण्यात येणार आहे. नागरिकांना पार्किंगमध्येच वाहने लावावी लागणार आहेत. नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांना महाराष्ट्रातील इतर मनपाच्या धर्तीवर प्रशमन शूल्क (दंड) लावले जाणार आहेत. नागरिकांनी आपले वाहन पार्किंग पॉलिसीनुसार निश्चित केलेल्या जागेतच लावावे. पुढील प्रशमन शूल्क आकारणीची कारवाई टाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील व पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संयुक्तरित्या केले आहे.    

Share to