भोसरीत राजकीय भूकंप : भाजपाचे 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला ?
- माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय खेळीचा करिश्मा
- भोसरी विधानसभेतच भाजपाला उतरती कळा
पिंपरी (प्रतिनिधी) –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक संजय नेवाळे हे पक्षावर कमालीचे नाराज दिसत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचा मोका साधत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या वतीने विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यासोबत भाजपावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे नगरसेवक रवी लांडगे आणि नगरसेविका अश्विनी बोबडे यांचे पती भीमा बोबडे यांना देखील यावेळी लांडे आल्याचे पाहून त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्याचा मोह आवरला नाही. भाजपाचे नगरसेवक मिष्किलपणे स्मितहास्य करत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. नाराजांना एकत्र आणण्यासाठी लांडे यांची ही राजकीय खेळी बरेच काही सांगून जात आहे. नगरसेवक नेवाळे यांच्यासह भाजपाचे जवळपास 30 नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समजते. माजी आमदार लांडे यांच्या राजकीय डावपेचामुळे भाजपाला भोसरी विधानसभेतच सुरूंग लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर पक्षाने पद वाटपात अनेकांना डावलले. निष्ठावंत म्हणून नेत्यासाठी जीवाचे राण करणा-या असंख्य नगरसेवकांना पक्षाकडून संधी दिली गेली नाही. त्यामुळे भाजपाच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. भोसरी विधानसभेतील भाजपाचे नगरसेवक आता पर्याय शोधू लागले आहेत. हे वातावरण तयार होण्यास स्थानिक पदाधिकारी व नेते जबाबदार आहेत. भोसरीचे आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी अनेकांना पदे दिली. परंतू त्यांनी अनेकांना डावलल्यामुळे त्यांच्यावर नाराजी ओढवून घेण्याची वेळ आली आहे. बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांना स्थायी समिती सभापती पद नाकारले. त्यामुळे त्यांनी भोसरी पट्ट्यात फ्लेक्सबाजी करत पद नाकारल्याचा जाहीरपणे जाब विचारला. मोशीतील वसंत बोराटे आणि दिघीच्या निर्मला गायकवाड यांना उपमहापौर पदावर संधी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, शेवटपर्यंत त्यांना झुलवत ठेवून त्यांची गच्छंती करण्यात आली. चिखलीच्या नगरसेविका अश्विनी जाधव आणि मोशीतील नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांना देखील गेल्या साडेचार वर्षात नामांकीत पदापासून वंचित ठेवण्यात आले.
च-होलीत राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला भाजपात सामिल करून त्यांना ताकद दिल्यामुळे भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांची व पदाधिका-यांची गोची झाली. प्रस्तापितांना संपवण्यासाठी विरोधकांना ताकद दिली जात असल्याचा सूर तेथील कार्यकर्त्यांमध्ये उमटला आहे. भोसरीतील नगरसेविका प्रियांका बारसे या सुध्दा नाराजी व्यक्त करताना दिसतात. मी माझ्या स्व-कर्तृत्वामुळे असून कोणत्याही पक्षामुळे मी नगरसेविका झालेली नाही, असे त्या वेळोवेळी सांगत असतात. नगरसेवक रवी लांडगे यांच्यासह आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक असलेले संतोष बारणे यांनी देखील नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. नेत्यांच्या साठमारीमुळे भाजपात राजकीय कोंडमारी होऊ लागल्याने बहुतांश आता अन्य पक्षाचा पर्याय शोधू लागले आहेत.

आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नगरसेवक संजय नेवाळे यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर नेत्यांचे फोटो टाकले नाहीत. लांडगे यांनाच फ्लेक्सवरून डावलल्याने नेवाळे यांची नाराजी स्पष्ट दिसून आली आहे. पक्षांतर्गत निर्माण झालेल्या नाराजीमुळे भाजपातील एकेक कार्यकर्ता माजी आमदार विलास लांडे यांच्या संपर्कात असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, लांडे यांनी नगरसेवक नेवाळे यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. संत तुकाराम महाराज यांची पगडी आणि शाल-श्रीफळ देऊन त्यांनी नेवाळे यांच्यावर शब्दसुमनांची बरसात केली आहे. त्यावेळी नगरसेवक रवी लांडगे आणि नगरसेविका अश्विनी बोबडे यांचे पती भीमा बोबडे यांची उपस्थिती बोलकी ठरली. नेवाळे यांच्यासह भाजपाचे 25 ते 30 नगरसेवक लांडे यांच्या संपर्कात आसल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी शहराची राजकीय गणिते आखण्यास सुरूवात केली असून येत्या काळात भाजपातील फुटीर नगरसेवकांचा राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात प्रवेश होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद दिल्यामुळेच लांडे एकेक राजकीय डाव टाकत सुटले आहेत. विशेष म्हणजे त्यांची खेळी यशस्वी होताना दिसत आहे. भाजपातील नाराज नगरसेवकांची मोट बांधून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लांडे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यात कितपत यशस्वी होतील, हे येणा-या काळात पहायला मिळणार आहे.