शरद पवारांच्या आवाजाची नक्कल करून पैशांची मागणी
पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून पैसे मागितल्या प्रकरणी तिघांवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धीरज धनाजी पठारे (रा. यशवंतनगर, खराडी) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी प्रतापराव वामन खांडेभरड (रा. कडाची वाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपीने फिर्यादीसह त्यांची पत्नी व मेहुणा यांच्या मोबाईलवर वारंवार फोन केला. फोनवर तसेच प्रत्यक्ष घरी येऊन व्याजाचे पाच कोटी रुपयांची मागणी केली. ”पैसे नाही दिले तर, माझ्याशी गाठ आहे. मी तुम्हाला संपवून टाकीन” अशी धमकी दिली. तसेच ९ ऑगस्टला एका वेबसाईटचा वापर करून तसेच अज्ञात व्यक्तिमार्फत फिर्यादीला फोन केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून ‘धीरज पाठारे याचे पैसे देऊन टाक अन् प्रकरण संपवून टाक’ अशी धमकी दिली. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास करीत आहेत.