सौरउर्जा पंप देण्याची महायुती सरकारची घोषणा म्हणजे जुमलेबाजी – संतोष सौंदणकर
पिंपरी (दि. २८ जून २०२४) :- महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी (दि. २८) रोजी विधानसभेत सादर केला. या बजेटमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. महायुती सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे.
साडेआठ लाख नवीन सौर ऊर्जेचे पंप मंजूर करून, मागेल त्याला सौर कृषी पंप याचं नियोजन असून ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे. 90-95 टक्के शेतकरी मोफत वीजेचे लाभार्थी होतील. उपसा सिंचन योजना याच्याशी सौर ऊर्जेकरणाचं काम सुरू केलं आहे, अशी तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती महायुती सरकारने विधानसभेत दिली.
दरम्यान या मुद्द्यावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी महायुतीला घेरले आहे. प्रतिक्रिया देताना सौंदणकर म्हणाले, सौरउर्जा पंप देण्याची महायुती सरकारची घोषणा म्हणजे जुमलेबाजी आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला मतांसाठी चुचकारण्याचा हा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. मागेल त्याला सौरऊर्जा पंप आणि अखंडित वीजपुरवठ्याची हमी देण्याची ही केवळ घोषणा असून पुन्हा एकदा गाजराचं आश्वासनच म्हणाव लागेल. शेतकऱ्यांनी महायुती सरकारचा हा कावेबाजपणा ओळखावा. राज्याच्या कृषी क्षेत्रास संजीवनी देण्याची क्षमता केवळ उद्धव साहेबांच्या शिवसेनेतच आहे.