लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी शिवसैनिकांच्या खिशातून पहिली ओवाळणी – संतोष सौंदणकर
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- उद्धव साहेबांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत केलेला दणदणीत पराभव सत्ताधारी भाजपच्या जिव्हारी लागला आहे. भाजपसह मिंधे सरकार कावरं बावरं झाल असून, काय करावं याच दोघांनाही भान राहिलेलं नाही. त्यामुळे इर्षेने पेटून प्रशासनाच्या आडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष केले जात आहे. पुण्यातील शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्यातून त्याचा प्रत्यय आलाच आहे. निधीअभावी फसलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी आता शिवसैनिकांच्या खिशातून रक्कम काढली जात आहे काय? हे भाजपसह एकदाचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा विजयानंतर शिवसेना आता विधानसभेसाठी सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शिवसंकल्प मेळावा पुण्याच्या स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा मंदिरात सकाळी पार पडला. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.
दरम्यान पार्किंग व्यवस्था अपुरी पडली. त्यामुळे शिवसैनिकांनी आपली वाहनं सभागृहाच्या बाहेर दुतर्फा लावली होती. वाहने लावत असताना वाहतूक पोलिसांनी कार्यकर्त्यांची अडवणूक केली नाही. कायर्क्रम झाल्यांनतर मात्र, सभागृहाबाहेर लावलेल्या सर्वच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांकडून तब्बल पंधराशे रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली. हा गैरप्रकार निदर्शनास येताच आम्ही वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. मात्र त्यांनी आमचं एकल नाही. वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून केली. या हेतुपूर्वक कारवाईचा आम्ही शिवसैनिक म्हणून निषेध व्यक्त करतो.
दंडापोटी जमा केलेले पंधराशे रुपये ‘लाडकी बहिण’ योजनेच्या पहिल्या टप्यासाठी शिवसैनिकांच्या खिशातून काढले. भाजप आणि शिंदे सरकारचा मिंधेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. उद्धव साहेबांनी मेळाव्यात म्हटल्याप्रमाणे ‘लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावर उठलेत. त्यापेक्षा अधिक वळ विधानसभेच्या निकालात उठतील. त्यानंतर तुमची वळवळ कायमची थांबलेली असेल. ज्याप्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली. त्याप्रमाणे भाजप आणि मिंधे गटाची कबर आपण महाराष्ट्रात बांधू, आणि यासाठी आम्ही शिवसैनिक आजच सज्ज झालो आहोत, असे या पत्रकात सौंदणकर यांनी म्हटले आहे.
”वाहतूक पोलिसांनी शिवसैनिकांवर कारवाईसाठी तत्परता दाखविली, तशी भाजप अथवा मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचं आजपर्यंत निदर्शनास आलं नाही. त्यांचे अनेक कार्यक्रम पुण्यात झाले. तेव्हादेखील अनधिकृत फ्लेक्स, बेकायदेशीर वाहतूक, नियमांची मोडतोड त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे केलीच होती. तेव्हा हे कारवाई करणारे बगलबच्चे कुठे होते. फक्त शिवसैनिकांनाच टार्गेट का केल? त्यांचा बोलविता धनी कोण? हे समोर आलं पाहिजे”. – मा. संतोष सौंदणकर, शहर संघटक – चिंचवड विधानसभा…