मनसेच्या स्टंटबाजीवर आदित्य ठाकरेंची खोचक टिका, म्हणाले हा तर संपलेला पक्ष
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले. तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या भाषणावर टीका केली.
आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं. दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, मनसेच्या या स्टंटबाजी नंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना “शिवसेना भवन मशिद आहे का अशी विचारणा मनसेनं केल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही, असा खोचक टोला लगावला. यावेळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.