शाब्बास रे पट्ट्या ! टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा ‘एमपीएससी’ परिक्षेत प्रथम

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2021 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. मुलाखत झाल्यानंतर अवघ्या काही तासातच परिक्षेचा निकालही लागला. हे असं पहिल्यांदाच घडल्याने विद्यार्थी अचंबित झाले तर काहींनी आनंद व्यक्त केला.

या परिक्षेत प्रमोद बाळासाहेब चौगुले याने पुर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला परिक्षेत तब्बल ६१२ गुण मिळाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर नितेश नेताजी कदमहा ५९१ गुण, तर तिसऱ्या क्रमांकावर रुपाली गणपत माने ५८० गुणांसह उत्तीर्ण झाली आहे. तिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेमध्ये पहिल्या वर्गाची पदे भरण्यात येणार आहेत.

…चला तर मग प्रमोद चौघुलेबद्दल माहिती जाणून घेवुयात

प्रमोद चौघुले याने पहिला क्रमांक पटकावला आहे. २०१५ पासून प्रमोद स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत होता. सुरूवातीला त्याला अपयश आलं पण शेवटी त्याने करून दाखवलं. गेल्या परिक्षेत फक्त एका मार्काने त्याचा क्रमांक हुकला होता. आता थेट राज्यातून पहिला येत त्याने सगळ्यांना अवाक केले. हा प्रवास सोप्पा नव्हता. कोरोनाकाळात सांगलीत पुर आला होता. त्यावेळी त्याच्या घरचे सगळे कोरोनाबाधित झाले होते. प्रमोद तरीही एकटा अभ्यास करत होता.

अत्यंत बिकट परिस्थितीतही त्याने आपले ध्येय सोडले नाही. प्रमोदचे वडील टेम्पो चालवतात तर आई शिवणकाम करते. घरी अर्धा एकर जमीन आहे. ज्यामध्ये ते शेती करतात. अशा परिस्थितीतही प्रचंड मेहनत करून त्याने आकाशात झेप घेतली आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबाबत असंतोष पसरला होता.

कोरोनामुळे प्राथमिक परिक्षेला खुप उशीर झाला होता. पण त्यानंतर लोकसेवा आयोगाने हालचाल सुरू केली. डिसेंबरमध्ये मुख्य परिक्षा पार पडली आणि एप्रिलमध्ये मुलाखती झाल्या. दरवेळी मुलाखतीनंतर तीन चार महिन्यांनी निकाल लागतो. पण यावेळी आयोगाने ही परंपरा मोडीत काढली. मुलाखत संपली की लगेच काही तासात निकाल लावला. निकाल जाहीर होताच प्रमोदच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी एकच जल्लोष सुरू केला.

Share to