मोबाईलचा चार्जरच्या वादातून गोळीबार, रहाटणीत तरुणाचा मृत्यू
पिंपरी – मोबाईलचा चार्जर घेताना झालेल्या वादातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना राहाटणी येथे रविवारी (दि.१५) रात्री घडली.
सोहेल इनामदार असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी किरण वासरे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहाटणीतील शिवराजनगर येथे एक्सपर्ट नावाचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. येथे आरोपी किरण वासरे रविवारी मोबाईलचा चार्जर आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी किरण व सोहेल यांच्यात वाद झाला.
यामध्ये किरण याने त्याच्याकडील पिस्तुलातून सोहेलच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी सोहेलला लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सोहेलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी किरण याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडे पिस्तूल कुठून आले, घटनेमागे अन्य काही कारण आहे, याबततचा अधिक तपास सुरू आहे.