महापालिका निवडणुकीसाठी 31 मे रोजी आरक्षण सोडत, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 31 मे रोजी आरक्षण सोडत होणार आहे. सोडतीनंतर प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत येत्या 31 मे रोजी होणार आहे.
महापालिका हद्दीत २०११ साली असलेल्या लोकसंख्येचा आधार घेऊन निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आळी आहे. त्यावेळी एकूण १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या होती. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या २ लाख ७३ हजार ८१० आणि अनुसूचित जमातीच्या ३६ हजार ५३५ लोकसंख्येचा समावेश आहे. त्यानुसार महापालिकेचे ३९ निवडणूक प्रभाग तयार करण्यात आले असून, तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या एकूण १३९ असणार आहे. त्यातील २२ जागा अनुसूचित जातीसाठी, तीन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यंदा ओबीसी आरक्षण नसणार आहे. त्यामुळे उर्वरित ११४ जागा खुल्या असतील. प्रत्येक प्रभागात महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा असतील.