अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा
मुंबई – डीएचएफएल प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. अविनाश भोसलेंनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अविनाश भोसलेंच्या मालमत्तेचा ताबा ईडीने घेऊ नये, असे आदेश दिले आहेत.
सीबीआयने डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसलेंविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरातील काही संपत्तीवर सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर गुरूवारी त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहे.
दरम्यान, ईडीने फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. परदेशात त्यांनी केलेल्या गुंतवणूकीबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली होती. जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावरील 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. ही कारवाई विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत करण्यात आली होती.