ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये दिमाखात आगमण

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जंगी स्वागत
  • आकुर्डी येथील दत्त मंदिरात पालखीचा मुक्काम

पिंपरी (प्रतिनिधी) – ‘ज्ञानोबा तुकाराम… विठ्ठल विठ्ठल…’च्या नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजता देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. हरिनामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या निनादात पालखी गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच ग्रामस्थांनवी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. वारक-यांच्या हरिनामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम देहूतील इनामदारवाड्यातच होता. मंगळवारी सकाळी नऊ वाजता परंपरेनुसार इनामदारवाड्यात शासकीय महापूजा झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्नी विजया देशमुख, पिंपरी-चिंचवड अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार गीता गायकवाड यांच्याहस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, दिलीप इनामदार गोसावी, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. प्रशांत जाधव, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, सुधाकर शेळके, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, कांतिलाल काळोखे व इतर उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता इनामदारवाड्यातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. देहूतील बाजारपेठेत महिलांनी दुतर्फा दर्शनासाठी गर्दी केली होती. नगरपंचायत कार्यालयाजवळ नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारीतील दिंडी प्रमुखांना औषधांचे किट वाटण्यात आले. दुपारी बारा वाजता अनगडशावली बाबा दर्ग्याजवळ पालखीचे आगमन झाले. परंपरेनुसार येथे आरती झाली. माळवाडी येथील शेतकरी सहादु परंडवाल आणि पोपट बिरदवडे कुटुंबीयांकडून भाविकांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी बाळासाहेब काशीद, प्रीतम वारघडे, विजय परंडवाल, संजय बिरदवडे आदी उपस्थित होते. आरतीनंतर फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात पालखी ठेवण्यात आली. पालखी रथाचे माळवाडी, झेंडेमळा, चिंचोली येथे आगमन होताच ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली. रथाच्या पुढे २५ दिंड्या आणि रथामागे ३०० दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. तसेच, मानाचे अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

सायंकाळी पाचच्या सुमारास पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तुकोबांच्या दिंडी सोहळ्याचे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात जंगी स्वागत केले. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड काँग्रेस, शिवसेना तसेच इतर सामाजिक संघटनाच्या वतीने देखील पालखीचे स्वागत करण्यात आले. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पालखीचे आगमन होताच हरिनामाचा गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पालखी आकुर्डी येथील श्री दत्त मंदिरात मुक्कासाठी रवाना झाली. पालखीच्या पाठीमागून दिंड्या येत होत्या. प्रत्येक दिंडीकरी व विणेक-यांचे पालिकेच्या वतीने स्वागत करून त्यांना सुरक्षा किट देण्यात येत होती. तर सामाजिक संघटना व राजकीय पक्षांकडून खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात येत होते. भक्ती-शक्ती चौक परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा घाण पडणार नाही, याची पालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. अशांतता निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अग्निशामक दलाचे बंब, रुग्णवाहिका, रॅपीड एक्शन फोर्स तैनात करण्यात आले होती.

Share to