माझी दुसरी शस्त्रक्रिया, आदित्य विदेशात… याचा फायदा घेत भाजपाने… मुख्यमंत्री उध्दव ठाकरे झाले भावूक

मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपासोबत जाण्यासाठी दबाव असल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

“मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे, असं सांगितलं होतं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरिरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते”, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आमदार गुजरातला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर काही आमदारांना निवासस्थानी बोलावलं होतं अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी काही झालं तरी सोडून जाणार नाही असं सांगितलं होतं. पण त्यावेळी उपस्थित असणारे दादा भूसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचं करायचं काय? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी करत वाईट वाटत असल्याचंही नमूद केलं.

Share to