संपतराव (भाऊ) शिंदे यांच्या निधनाने शिंदे कुटुंबियांचे दुःख न भरून येणारे – माजी आमदार विलास लांडे
पिंपरी – पिंपरी चिंचवडचे जेष्ठ पत्रकार संजय शिंदे यांचे वडील संपतराव (भाऊ) गणपतराव शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. शिंदे कुटुंबियांसाठी हे न भरून येणारे दुःख आहे. सामाजिक, अध्यात्मिक वारसा जपणारे संपतराव भाऊ हे जिव्हाळ्याचे नाते निर्माण करत होते. त्यांच्या जाण्याने एक चांगले व्यक्तिमत्त्व हरपले, अशा दुःखद भावना भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केल्या.
विलास लांडे म्हणाले की, विविध कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे जाणे व्हायचे. या वेळी अनेक वेळा पिंपरी चिंचवडचे जेष्ठ पत्रकार संजय शिंदे यांच्या घरी जाण्याचा योग आला. या दरम्यान संपतराव (भाऊ) शिंदे यांची ओळख झाली. पुढे आमचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. शिराळा भागात येणे जाणे झाले की घरी येण्याचा आग्रह ते धरत होते. शिराळा येथील विविध सामाजिक, राजकीय कामात भाऊ नेहमी सहभाग घेत होते. त्याची माहिती ते देत असत. धार्मिक, आध्यात्मिक गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर असल्याने ते त्यावर भरभरून बोलायचे.
संपतराव (भाऊ) शिंदे यांनी त्यांच्या मुलांवर देखील योग्य संस्कार केले. त्यांच्या जडणघडणीत वाढलेली दोन्ही मुले आज स्व: कर्तृत्वाने आपापल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत. एक मुलगा शासकीय सेवेत अधिकारी म्हणून आपली सेवा बजावत आहे. तर दुसरा मुलगा पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले योगदान देत आहे. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. मात्र संपतराव (भाऊ) शिंदे यांच्या सारखा धार्मिक, आध्यात्मिक विचारांचा वारसा जपणारे व्यक्तिमत्त्व हरपणे हे दुःखदायक आहे, अशा भावना माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केल्या