भाववाढ आणि केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापर या मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेचे कामकाज पाडले बंद
मुंबई – भाववाढ आणि केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मंगळवारी लोकसभेचे कामकाज बंद पाडले. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करायला लागले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची “नॅशनल हेरॉल्ड” वर्तमानपत्राशी संबंधित मनी लॉन्डरिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी करण्यात आल्यामुळे केंद्रीय तपास संस्थांच्या केंद्र सरकारकडून होत असलेल्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित झाला.
सकाळी 11 वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर “कारगिल विजय’ दिवसाच्या निमित्ताने सभापती ओम बिर्ला यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर लगेचच विरोधक सभापतींपुढील मोकळ्या जागेत एकत्र आले आणि त्यांनी फलक फडकावून महागाई आणि अत्यावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. या गदारोळामुळे 11.45 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले गेले.
विरोधकांनी सभागृहात आणलेल्या कापडी फलकांवर गांधी यांचे चित्र होते आणि “सत्यमेव जयते’ असे लिहिले होते. तर काही फलकांवर “ईडीचे राज्य सहन केले जाणार नाही.’ असे लिहिले होते. कॉंग्रेसचे सदस्य जीएसटी आणि पेट्रोलियम पदार्थांबरोबर अन्य जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ मागे घेण्याच्या मागणीच्या घोषणा देत होते. सभापती ओम बिर्ला यांनी या सदस्यांना बोलण्याची परवानगी नाकारली आणि आपल्या जागेवर जाण्याची सूचना केली.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर निलंबित कॉंग्रेस सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी द्रमुकच्या सदस्यांनी केली. त्यावेळी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला आणि केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापराविरोधात राष्ट्रपती भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात ते सहभागी झाले. गदारोळ वाढल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.