पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धाड, भ्रष्ट सर्व्हेअरला घेतले ताब्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली असून सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर नगररचना विभागाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी दुपारी पावणे दोनच्या सुमारास एसीबीचे पथक दाखल झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. त्याची बंद दाराआड चौकशी सुरू आहे.
या सर्व्हेअरकडे पालिकेतील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलख ही गावे आहेत. या प्रकरणामुळे मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत. एसीबीने ताब्यात घेतलेल्या सर्व्हेअरची चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. संदीप लबडे असे सर्व्हेअरचे नाव आहे. त्याने एकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. ही माहिती कळताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारीच लबडे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे.
पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी सहा महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगररचना विभाग एसीबीच्या रडावर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतरही या विभागातील भ्रष्ट अधिका-यांच्या हाताला आवर बसला नाही. टेबलाखालून घेण्याची लालच अखेर कर्मचा-याच्या अंगलट आली आहे. काटे यांचे भाकित आज झालेल्या एसीबीच्या कारवाईने खरे ठरले आहे.