‘सीएनजी’ दरवाढीचा रिक्षा चालकांकडून निषेध
पिंपरी – रिक्षा चालक व सर्वसामान्य नागरिकांची अनेक वाहने सीएनजी गॅसवर धावतात पिंपरी चिंचवड, पुणे, चाकण, तळेगाव, हिंजवडी या परिसरातील सीएनजी गॅसचा भाव काल सहा रुपयांनी वाढवत ९१ रुपयांवर गेला. गेल्या पाच महिन्यात तब्बल २९ रूपयांची वाढ झाली. लवकरच हा आकडा शतक पार करेल? याची भितीही सामान्य नागरिकांमध्ये आहे. ही दरवाढ, प्रचंड महागाई व बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिक व रिक्षा चालकांत तीव्र नाराजी असून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. एकीकडे गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहेत मात्र जिल्हा प्रशासनाकडून रिक्षाच्या भाडे दरवाढीस शासन चालढकल करत आहे यासाठी तीव्र लढाई करू असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
आधी डिझेल, पेट्रोल व आता सीएनजी सहा रुपयांनी दरवाढ झाली याचा निषेध करत रिक्षा चालक भाडे दरवाढ मागणीसाठी आज कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, दिनेश गोटणकर, दिनकर खांडेकर, राजू बोराडे, रामा मोरे, गुरू बडदाळे, हनुमंत शेलार , पप्पू तेली, मनोज यादव, फरीद शेख, कासिम तांबोळी, राजू हांडे, सुखदेव कांबळे आदी उपस्थित होते. एकीकडे पेट्रोल ,डिझेल व गॅसचे दर वाढत आहेत. मात्र प्रवासी भाडे वाढवण्याबाबत प्रशासन कुठलाही निर्णय घेत नाही, वाढवण्यात आलेली तुटपुंजी दरवाढ तीही तेही सध्या सर्वांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना भाडेवाढ समाधानकारक देण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालकाकडून करण्यात आली आहे.
खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही व अजूनही देऊ शकले नाहीत.
यावर्षी एक एप्रिल ला ६२.२० र. दर होता , त्यानंतर २ एप्रिल ला ५.८० रू. १२ एप्रिल ला ५ रू. २८ एप्रिल ला ४.२० रू. २० मे ला २.८० , ८ जून ला २ रु.६ जुलै ला ३ रू. ३ ऑगस्ट ला ६ रू एव्हढ्या मोठ्या प्रमाणात गोर गरिबांवर दरवाढीचा हल्ला झाला आहे. महागाईत सामान्य नागरिकांनी जगायचे कसे? असा प्रश्न आहे, याकडे एकेकाळी रिक्षा चालवणारे आजचे मुख्यमंत्री लक्ष देतील का? हाच प्रश्न आहे असे नखाते म्हणाले.
भयानक परिस्थिती केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे याचा परिणाम सर्वसामान्य रिक्षा व टेम्पो, प्रवाशीवाहन चालकावरती झाला. आधीच दरवाढ करून पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर पाच रुपये कमी केल्याचे सांगून मोठी प्रसिद्धी मिळवणारे राज्य सरकार आता रिक्षा चालकांकडे पाहतील काय असा प्रश्न राजू बोराडे यांनी केला आहे. पुढच्या कालावधीमध्ये गॅस दरवाढ कमी नाही झाली आणि रिक्षा चालकांना भाडे दरवाढ मिळाले नाही तर रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशाराही नखाते यांनी दिला आहे.