गणेशोत्सवात गर्दी होवू नये म्हणून प्रभागनिहाय फिरती पथके नियुक्त – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी – गणेशोत्सवादरम्यान शहरामध्ये नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे. या वर्षी कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणेशोत्सवामध्ये नागरिकांची बाजारपेठांमध्ये तसेच गणेश मंडळांजवळ गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रभागस्तरावर महापालिका आणि पोलीस प्रशासन यांची फिरती पथके नियुक्त करणे आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले.

शहरातील यंदाचा गणेशोत्सव कोरोना-19विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शांततामय व उत्साही वातावरणात पार पडण्यासाठी महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांची संयुक्त नियोजन बैठक महानगरपालिका मुख्यालयातील कै. मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. महापौर उषा ढोरे, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, सुधीर हिरेमठ, महानगरपालिकेचे उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, सतीश इंगळे, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सोनम देशमुख, सुचिता पानसरे, श्रीनिवास दांगट, सिताराम बहुरे, विजयकुमार थोरात, उमाकांत गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, प्रेरणा कट्टे, श्रीकांत दिसले, संजय नवलेपाटील, एन.एस.भोसले-पाटील, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून शहरातील गणेशोत्सव उत्साही व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन व महानगरपालिका समन्वय साधून कामकाज करावे असे निर्देश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. गणेशमूर्ती दान म्हणून स्विकारणाऱ्या वाहनांची योग्य ती सजावट करावी. गणेश मंडळांसोबत प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रभागस्तरावर बैठकांचे नियोजन करावे. नागरिकांमध्ये गणेशोत्सवाच्या नियमांबाबत जागृती करणेसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

Share to