खातेवाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

मुंबई – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठींबा दिला आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या कालावधीमध्ये विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर वारंवार मंत्रिमंडळ विस्तारावरून निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. आता खातेवाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे.

विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार टीका झाल्यानंतर आता खातेवाटपावरून प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे. आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कोणाला कोणतं खात मिळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांना पत्रकारांनी खातेवाटप कधी होणार असा प्रश्न केला असता ते म्हणाले,”“खातेवाटप लवकरच होईल. काळजी करू नका. याबाबत लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खातेवाटप करत आहात. आम्ही पेपर फोडला, तर तुम्हाला काम मिळणार नाही.” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला आणि अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. विरोधकांच्या टिकेसह मुंबईतील मेट्रो कारशेडबाबत होणाऱ्या टीकेलाही फडणवीसांनी यावेळी उत्तर दिल. आगामी स्वातंत्र्य दिन आणि विधानसभा अधिवेशन या पार्श्वभूमीवर कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

Share to