दारूचे व्यसन ; नवीन संसाराची बसेना घडी
– वाळवा तालुक्यातील चित्र ; लग्न न जमल्याने तरुणांसह कुटुंबाच्या चिंतेत वाढ
– गावागावात वाढला दारूबंदीच्या चळवळीचा जोर
सांगली : प्रदीप लोखंडे
गावागावांमध्ये रोजगाराच्या संधी घटल्या आहेत. परिणामी हाताला काम नाही आणि पैशाची ओढाताण वाढली आहे. ही चिंता मिटविण्यासाठी अनेक तरूण दारूच्या आहारी जात आहेत. या व्यसनामुळे तरुणांच्या संसाराची घडी बसताना दिसत नाही. मुली न मिळाल्याने लग्न जमण्यात अडचणी येत आहेत. याचा फटका तरुणांच्या मानसिक संतुलन बिघडण्यात होत आहे. वाळवा तालुक्यातील विविध गावात हे चित्र आहे. त्यामुळे गावागावात दारूबंदीची चळवळ आता जोर धरू लागली आहे.
२० वर्षे ओलांडल्यानंतर तरुण आणि तरुणींच्या लग्नाची चिंता कुटुंबीयांना लागत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या पुढे वय गेल्यानंतर मुलांची आणि मुलींची लग्नासाठी कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरू होत आहे. अनेकदा लग्न जमण्याची देखील परिस्थिती तयार होते. मात्र त्यामध्ये तरुणांच्या दारूचे व्यसन अडसर ठरत आहे. दारूचे व्यसन असल्यास आपल्या मुलीला त्रास होईल या भीतीपोटी मुलींचे कुटुंबीय लग्नासाठी तरुणांना नकार देताना दिसत आहे. त्याचा परिणाम तरुणांचे चिंतेत वाढ होण्यास होत आहे. एकदा लागलेले दारूचे व्यसन सुटता सुटत नसल्याने त्याच्या अनेक परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. घरातील आपल्या मुलांच्या या वागण्यामुळे कुटुंबातील सदस्य देखील चिंता व्यक्त करताना दिसत आहे.
ही समस्या मिटवण्यासाठी गावागावात सुशिक्षित आणि निर्व्यसनी लोकांकडून दारूबंदीच्या चळवळीचा आग्रह धरला जात आहे. त्यासाठी महिलांमध्ये जनजागृती केली जात आहे. आपल्या मुलाचे आयुष्य घडविण्यासाठी महिला देखील कंबर कसून दारूबंदीच्या चळवळीत हिरीरीने सहभाग घेत आहेत. काही गावात या मोहिमेला यश देखील येत आहे.
मुलींच्या अपेक्षांचे ओझे वाढले –
लग्न जमविताना मुलींच्या कुटुंबियांकडून देखील विविध अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मुलगा शासकीय नोकरीला हवा. पुणे, मुंबईत नोकरीला हवा. यासह विविध अपेक्षा कुटुंबियांकडून व्यक्त केल्या जात आहेत. या अपेक्षा तरुणांकडून पूर्ण होत नसल्याने लग्नाची गाठ जुळत नसल्याचे चित्र आहे.
शेकडो एकर जमीन तरीही नापसंती –
अनेक जणांना ४० एकर ते १०० एकर जमीन आहे. त्या आधारावर आपले लग्न जमेल अशा विचारात अनेक जण असतात. मात्र सध्या लहरी हवामान पाहता शेतीची अवस्था देखील वाईट होत आहे. अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे एवढी जमीन असूनही मुलींचे कुटुंबीय लग्नासाठी नकार देत असल्याची वस्तुस्थिती दिसत आहे.
तरुणांनो दारूचे व्यसन पर्याय न्हवे –
रोजगार मिळत नसेल तर व्यवसायाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. लग्न जमत नसेल तर दारूला सोडणे आवश्यक आहे. मात्र तरुणांकडून या उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसते. रोजगार आणि लग्न न जमल्यास दारूच्या व्यसनात तरुण वाढ करत आहेत. मात्र दारूचे व्यसन वाढविणे हा पर्याय नसल्याची भावना अनेक मान्यवर व्यक्त करत आहेत.
———————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967