जीआयएस प्रणालीद्वारे मिळकतींना सुधारीत सेवा, पारदर्शक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनात मदत होणार – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी – जी.आय.एस. प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत येणा-या सर्व मालमत्तांचे जी.आय.एस./GIS (भौगोलिक माहिती प्रणाली / Geographical Information System) सर्वेक्षण स्मार्ट सिटी मार्फत हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक सेंटर, दुसरा मजला याठिकाणी जी.आय.एस. प्रकल्पाच्या इआरपी डेव्हल्पमेंट सेंटरचे उद्घाटन सोमवार, दि. १५ ऑगस्ट रोजी प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी, अतिरिक्त्‍ आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मॅनेजिंग डायरेक्टर (इन्फ्रा) अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, उप अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, अनिता कोटलवार, उज्ज्वला गोडसे, अविनाश पाटील, ऋषिकेश भिसे, कल्पेश बोंडे, सुधिर बोराडे आदी उपस्थित होते.

पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपा व स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वेक्षणाचे कामकाज करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने जीआयएस सक्षम ईआरपीवर एकात्मिक प्रकल्प म्हणून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, जीआयएस, ईआरपी आणि डिजिटल वर्कफ्लो व्यवस्थापन सुरू झाल्यापासून एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहे. या प्रकल्पांतर्गत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) १००० हून अधिक प्रक्रियांवर व्यवसाय प्रक्रिया पुनर्रचना करण्यात आली आहे. मिळकतीचे सर्वेक्षण व माहिती संकलित करण्यासाठी ऐटॉस इंडिया प्रा.लि. यांचे मार्फत नियुक्त केलेले सर्व्हेअर / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत नागरिकांकडून आवश्यक माहिती घेण्यात येत आहेत. ईआरपी, जीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटची संपूर्ण कार्यक्षमता एकमेकांशी जोडलेली आहे. या उपक्रमांतर्गत, GIS ची कार्यक्षमता विभागांच्या दैनंदिन कामकाजाशी जोडली जाणार आहे. जेणेकरून PCMC चा GIS डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट करता येईल.

जीआयएस (GIS) सक्षम एकात्मिक (ERP) प्रकल्प भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिका सर्व विभाग जीआयएस (GIS) वातावरणात इआरपी द्वारे जोडले जातील. तसेच, एंटरप्राइझ-वाइड रिसोर्स प्लॅनिंग दृष्टीकोनाद्वारे महानगरपालिकेच्या विविध भू-स्थानिक माहितीचा (डेटा) सर्वात चांगल्या प्रकारे वापर होऊन नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

प्रकल्पाची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये :-

जीआयएस, ईआरपी आणि वर्कफ्लो मॅनेजमेंट सिस्टम एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहेत. संपूर्ण शहरासाठी लायडर (LiDAR) सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाद्वारे १० सेंटीमीटर एवढी लहान वस्तू देखील अचूकतेने सहजपणे मोजली जाऊ शकते. झोपडपट्ट्यांमध्ये बॅकपॅकच्या सहाय्याने LiDAR सर्वेक्षण केले जात आहे. त्याद्वारे संपूर्ण शहर ३६०-डिग्रीमध्ये टिपले गेले आहे. उत्तम प्रशासनासाठी LiDAR डेटा आणि GIS बेस मॅपसह एकत्रित केला जाणार आहे. हा डेटा मालमत्ता कर डेटाबेससह एकत्रित करून अधिकार्‍यांकडून मालमत्तांना प्रत्यक्ष भेट न देताही पडताळणी केली जाऊ शकते. GIS डेटाबेसमध्ये २६०+ GIS स्तर आहेत, ज्यात पाईप लाईन, ड्रेनेज लाईन इत्यादी भूमिगत उपयुक्ततेचे संपूर्ण नेटवर्क आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील उपग्रहाची डिजिटल प्रतिमेची खरेदी दर ६ महिन्यांनी नियमितपणे केली जाणार आहे. या तंत्रज्ञानाने अनधिकृत बांधकामे, शहराची वाढ, अतिक्रमण इत्यादी शोधून त्यानुसार योग्य नियोजन किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

यामध्ये शहराचे दृश्य 3D प्रतिमेमध्ये दाखविण्यात येणार आहे. शहराच्या भूभागाचा अभ्यास करण्यासाठी आणि पाणी अडवण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी शहराचे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (DEM) तयार करण्यातही ते मदत करेल. महापालिकेच्या गतिविधींसाठी ३५ हून अधिक आयटी ऍप्लिकेशन्स एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहेत. हे मॉड्यूल ४० हून अधिक महापालिकेतील विभागांमध्ये लागू केले जातील. सद्य:स्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात सहा लाख हून अधिक मालमत्तांचे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.

Share to