कोथुर्णे येथील पीडित मुलीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री करणार पाच लाखांची मदत
पुणे – वडगाव मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या मदतीची घोषणा केल्याचे भेगडे यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री भेगडे यांनी गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच, पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.