पुण्यात राजेंद्र पवार यांच्या नियुक्तीमुळे महावितरणाला मिळाला संकट मोचक – संतोष सौंदणकर

  • पिं. चिं. इलेक्ट्रिकल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे अभिनंदन

पिंपरी :- महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी राजेंद्र पवार यांची बुधवारी (दि. ३०) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पवार हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील भऊर येथील रहिवासी आहेत. त्यांनी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथेही काम केले आहे. 

पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ५) रोजी नवनियुक्त मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांची पुण्यात शुभेच्छा भेट घेतली. नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव नितिन बोंडे, उपाध्यक्ष जावेद मुजावर, विशाल रोकडे, नटराज बोबडे, सभासद सूरज बराटे, किशोर पाटील, बाळासाहेब गाडे, महेश बाबर, अमोल कोकाटे, संजीव पाटील, अरुण ढाके, प्रदीप पाटील, सुनील पवार, बाळासाहेब मलंगनेर, हितेश नेमाडे, मनोज शेळके आदी उपस्थित होते.

त्यांच्या कार्याबद्दल माहिती देताना कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर म्हणाले, २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून राजेंद्र पवार यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. बुधवारी त्यांना मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाली आहे. राजेंद्र पवार हे गेल्या पाच वर्षापासून महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेती प्रश्नाची आणि अडचणींची चांगलीच जाण होती. त्यांनी आजवर ग्रामीण भागात शिवधनुष्य पेलवत संकट मोचकाची जबाबदारी लीलया पार पाडली आहे. यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी पुढाकार घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मुंबईतील २००५ च्या महापुरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी ५० कर्मचाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व केले होते. मुंबईत सलग १० दिवस थांबून वीज पुरवठा पुर्ववत केला होता. कोरोनाच्या संकटकाळात २०२० जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाने आतोनात नुकसान केले. त्यात पुणे ग्रामीण मधील साडेपाच हजार वीज खांब कोसळले. त्यामुळे मोठ्या भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. राजेंद्र पवार यांनी स्वतःच्या नेतृत्वात हे काम युद्ध पातळीवर एका महिन्यात पूर्ण केले. त्यामुळेच अनेक गावांचा वीज पुरवठा सुरू होऊ शकला होता.

Share to