प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची रात्रभर ‘खलबते’

  • ग्रामपंचायत निवडणुकीत तोडगा काढण्यासाठी गावागावातील नेत्यांशी केल्या चर्चा

महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे

ग्रामपंचायत निवडणुकीत होणारे वाद टाळून योग्य तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री तब्बल ३ वाजेपर्यंत राष्ट्रवादीच्या गावागावातील नेतेमंडळींशी त्यांनी स्वतः चर्चा केली असल्याचे सूत्रांकडून समजते. गटागटाला किती उमेदवार द्यायचे, सरपंच पद कोणाकडे असेल, माघार कोणी घ्यायची यासह अनेक विषयांवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी चर्चा केल्याचे समजते. साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर साखर कारखाना परिसरात राष्ट्रवादीची ही खलबते रंगली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शब्दाला मान देऊन नेतेमंडळी उमेदवारांची माघार घेऊन तोडगा काढणार की निवडणुकीला सामोरे जाणार, हे दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अर्ज माघारीची मुदत संपून चिन्हांचे वाटप झाल्यास खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मग सुरु होणार हॉटेल मधील जेवणावळ्या, प्रचारासाठी गावागावात फेऱ्या, दिवसरात्र गुपचूप चालणाऱ्या चर्चा, पदरात मत पाडून घेण्यासाठी रात्रभर विरोधकांची मनधरणी. हे जरी नंतर होणार असले तरी वाळवा तालुक्याच्या गावागावातील गटांचे वाद मिटवून अंतिम तोडगा काढण्याचे प्रयत्न प्रत्येक पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. शिराळा आणि वाळवा विधानसभेत सध्या राष्ट्रवादी ताकदवान पक्ष झाला आहे. शिराळा विधानसभेत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सक्षम विरोधकच राहिला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुका राष्ट्रवादीच्या गटातटात होणार हे मात्र नक्की. भविष्यात हे वाद डोकेदुखी होईल, ही जाणीव राष्ट्रवादीचे बलाढय नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आहेच. शिवाय प्रदेशाध्यक्ष असताना जिल्ह्यातच राष्ट्रवादी अंतर्गत वाद असल्याचा संदेश राज्यभर जाणे योग्य नाही, याची देखील जाण प्रदेशाध्यक्ष पाटील यांना आहे. त्यामुळेच त्यांनी वाळवा आणि शिराळा मतदारसंघातील प्रत्येक गटाला चर्चेसाठी बोलावले. गावात सध्याची परिस्थिती काय आहे हे जाणून घेतले, गटागटात काय वाद आहेत, यावर चर्चा केली. वाद मिटवून कसा तोडगा काढता येऊ शकतात, यावर पर्याय सुचविले. जिथे तोडगा निघत नाही असे लक्षात आले, तिथे तुमच्या पातळीवर निर्णय घ्या, म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत चर्चेनंतर गटागटात चर्चा झाल्या खऱ्या. मात्र त्याला किती यश येणार हे अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

गटाच्या भांडणात भाजपाला फायदा ?

राष्ट्रवादीतील गावागावात वाद मिटले तरी काही गट नाराज होणार हे नक्की. हे नाराज गट इतर पक्षातील उमेदवारांना सहकार्य करून आपल्याच पक्षातील विरोधकांना नामोहरम करण्याची संधी राष्ट्र्वादीतीलच पदाधिकारी शोधतील असे चित्र आहे. सरपंच पदासाठी देखील हेच चित्र होईल. विरोधी गटाचा सरपंच होऊ नये, यासाठी राष्ट्र्वादीतीलच एक गट भाजपाला अंतर्गत मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील भांडणात भाजपाचा सरपंच होण्याची शक्यता देखील गावागावात आहे. अर्थात हे निवडणूक निकालानंतर अधिक समोर येणार आहे.

जयंत पाटील यांनी सिन्सियर नेतेपणाची चुणूक दाखवली

जनमाणसांशी नाळ ठेऊन मतदारसंघात काम केल्यास नेता कधीच पराभूत होत नसतो. शिवाय नेता राज्यभर आपले नेतृत्व सिद्ध करतो. महाराष्ट्रात अशी अनेक नेतेमंडळी आहेत. ज्यांचे कार्यकर्त्यांशी आपुलकीचे, सहज संवाद होणारे आहेत. त्यापैकीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एक आहेत. राज्यात बलाढय मंत्रीपदे भूषवून सध्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घातले आहे. गावागावात कार्यकर्त्यांचे नेमके वाद काय आहेत यासाठी रात्रभर बसून त्यांनी चर्चा केली. पर्याय सुचविले. तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीला यश येवो अथवा न येवो. मात्र दिवसभर राज्यभर पक्षाची कामे करून रात्रभर मतदारसंघातील गावागावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी ‘सिन्सियर नेतेपणाची’ चुणूक दाखवली आहे.

राष्ट्रवादीची भिस्त प्रामाणिक कार्यकर्त्यावर

नेतेमंडळींची कान भरून गावातील चुकीची माहिती सांगणारे राजकारणात अनेक असतात मात्र राष्ट्रवादीत प्रामाणिक काम करणारे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विश्वासू असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गावातील इत्यंभूत माहिती हे कार्यकर्ते देतात. त्यावरून गावात निवडणुकीचे काय चित्र असेल याची जाण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सारख्या बलाढय नेत्याला आधीच आलेली असते, असे चित्र आहे. मात्र तोडगा काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि गावागावातील प्रामाणिक कार्यकर्ते यावरच सध्या ग्रामपंचायत निवडणूक रंगणार हे मात्र नक्की.

  • प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
  • मो. नं – ७३५०२६६९६७
Share to