पुरस्काराच्या माध्यमातून समाजासाठी झटत राहण्याची मिळते प्रेरणा – संतोष सौंदणकर
- यंदाचा ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड २०२३‘ पुरस्कार संतोष सौंदणकर यांना प्रदान
- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
पिंपरी (दि. ३ ) :– पुरस्काराच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होतो. समाजासाठी झटत राहण्याची प्रेरणा मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या चांगल्या कामाचे व यशाचे मला आज प्रशस्तिपत्रक मिळाले आहे. ही ऊर्जा मला सतत प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारी आहे. हा पुरस्कार म्हणजे माझा, माझ्या व्यवसायाचा आणि सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य तथा शिवसेना (ठाकरे गट) शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केले.
लोकमत समुहातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्तींना ‘ लोकमत अचिव्हर्स ‘ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड २०२३‘ हा पुरस्कार संतोष सौंदणकर यांना जाहीर झाला. पुण्यात या गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सौंदणकर बोलत होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते यंदाचा ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड २०२३‘ हा पुरस्कार संतोष सौंदणकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमत समुहाचे निनाद देसाई, संपादक संजय आवटे, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सौंदणकर म्हणाले, या सन्मानामुळे आयुष्यात आजवर केलेली मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल अभिमान वाटतो. हा पुरस्कार मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील. हा माझ्या आयुष्यातील विशेष भाग्याचा दिवस आहे. ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड्स‘ पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल लोकमत समूहाच्या सर्व पर्यवेक्षकांचे आणि संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो.