सांगलीतील वाळवा तालुक्याच्या राजकारणात प्रतीक पर्वाला सुरुवात

महाईन्यूज : प्रदीप लोखंडे

सांगलीतील वाळवा तालुका आणि विधानसभा मतदारसंघाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दिवंगत जेष्ठ नेते राजारामबापू पाटील यांनी राज्यासह देशपातळीवर आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. विकासकामांचा वेगळा दृष्टीकोन, सहकार संस्थांचे जाळे विणले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजारामबापू यांचा कौटुंबिक आणि विचारांचा वारसा जोपासला. त्या विचारांना अधिक बळकटी दिली. जयंत पाटील यांचे नेतृत्व देखील राज्यासह देशात दखलपात्र ठरले आहे. आता त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे देखील जनसेवेच्या मैदानात उतरले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा तरुण शेतकऱ्यांच्या बांधावर, तरुणांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर तर पक्ष वाढविण्यासाठी जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये सहज वावरताना दिसत आहे. वडील मोठे राजकीय नेते असल्याचा आव चेहऱ्यावर कुठेच दिसत नाही. त्यामुळे तालुक्यात प्रतीक पाटील यांना तेवढीच पसंती मिळताना दिसत आहे. सध्या हा तरुण राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात उतरला आहे. कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा देखील त्यांच्याकडे जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे सांगलीतील वाळवाच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या बरोबरीने प्रतीक पर्वाला देखील सुरुवात होणार हे मात्र नक्की.

सांगली जिल्ह्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जयंत पाटील यांच्यासह प्रतीक पाटील आणि अन्य जणांनी अर्ज दाखल केला आहे. या कारखान्याच्या निर्मितीचा गंमतीदार इतिहास सांगितला जातो. कारखाना उभारताना काँग्रेस मधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राजाराम बापूंच्या या कारखाना निर्मितीला विरोध केला होता. मात्र बापूंनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा दिवंगत इंदिरा गांधी यांची भेट घेऊन कारखान्याला मंजुरी मिळवून आणली होती. याबाबत राज्यासह सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना पुसटशी कल्पना देखील नव्हती असे सांगितले जाते. त्यानंतर बापूंनी 14 महिन्यात हा कारखाना उभारला आहे. सध्या याच्या चार शाखा देखील झाल्या आहेत. मंत्री असताना जयंत पाटील यांनी या कारखान्याची धुरा आपले विश्वासू आणि राजारामबापुंचे जवळचे कार्यकर्ते असणाऱ्या कुरळप गावच्या पीआर पाटील यांच्यावर दिली होती. त्यांनी ती योग्यरित्या पार देखील पाडली.

पश्चिम महाराष्ट्रात कारखानदारी जोमात आहे. याच्यावर ज्यांचे वर्चस्व त्यांचा राजकारणावर पगडा असल्याचे दिसते. त्यामुळे प्रतीक पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असे म्हणता येईल. मात्र हे करताना त्यांनी सुरुवातीला संबंध तालुका आपल्या नजरेखालून घालविला आहे. प्रत्येक गावोगावी भेटी दिल्या. माणसांची पारख केली. तालुक्याचा अभ्यास केला. मोठे राजकीय घराणे असूनही प्रतीक पाटील यांची साधी राहणी सर्वांनाच आकर्षून घेणारी ठरत आहे. गोड, मृदू बोलण्याची जयंत पाटील यांची खासियत प्रतीक पाटील यांनी देखील तंतोतंत आत्मसात केल्याचे दिसते. त्याचा परिणाम म्हणून त्यांना राजकारणात तरुणांसह राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वीकारल्याचे दिसते. या कसोटीला पार केल्यानंतरच जयंत पाटील यांच्यासारख्या मुत्सुद्धी नेत्याने महत्वाच्या सहकारी संस्थांच्या प्रमुखपदासाठी रिंगणात उतरविले आहे. पुढची फळी तरुणांची असेल हे ओळखून प्रतीक पाटील यांच्या जोडीला नव्या तरुणांची फळी देखील उभारण्याचे काम जयंत पाटील यांनी करून ठेवले आहे. सध्या राष्ट्रवादीचे अनेक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे मोठ्या प्रमाणात तरुण असल्याचे त्यामुळेच दिसते.

कारखान्याची ही निवडणूक जयंत पाटील एकहाती जिंकणार यात तिळमात्र शंका नाही. मात्र त्यानंतर आपल्या वडिलांचा वारसा प्रतीक पाटील हे पुढे कसा घेऊन जातील, तालुक्याच्या विकासात आपला नवा दृष्टीकोन कोणता आणतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र सध्या तरी वाळवा तालुक्यात तरुण राजकारणी म्हणून प्रतीक पर्वाला सुरुवात झाली आहे स्पष्ट आहे.

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज

मो. नं – 7350266967

Share to