महापालिका देणार एक हजार विद्यार्थ्यांना चष्मे

विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी : शिक्षण विभागाचा उपक्रम लाभदायक

पिंपरी : – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करण्यात आली असून त्यातील एक हजार विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. त्याचा खर्च सीएसआर फंडातून भागवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितली.

महापालिकेच्या शहरात १०५ प्राथमिक आणि १६ माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये दोन्ही विभागात सुमारे ४३ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी नेत्रदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. ज्यांना डोळ्यांचा आजार नाही, अशाही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ऑक्टोबर २०२२ पासून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले. त्यामध्ये सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना नंबर लागलेला असून त्यांना चष्मे वाटप केले जाणार आहेत. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी आणि चष्मे वाटप करण्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च आहे. हा खर्च सीएसआर फंडातून केला जाणार आहे. त्यासाठी सीएसआर फंड उपलब्ध करुन देणा-या कंपन्यांसोबत संपर्क साधण्याचे काम सध्या सुरू आहे. काही कंपन्यांकडे या कामी शिक्षण विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्या कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येताच चष्मे वाटप प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त खोत यांनी सांगितली.

Share to