शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा ‘पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम’ मानबिंदू ठरेल – ज्ञानेश्वर लांडगे
- महिला दिनाचे औचित्य साधून इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफएमच्या आणि ‘आरोग्यमित्र फाउंडेशनचा’ सांस्कृतिक कार्यक्रम
पिंपरी :- शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच पिंपरी चिंचवडचा नावलौकिक आता सांस्कृतिक क्षेत्रात देखील झाला पाहिजे या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट नियोजन करीत आहे. आगामी काळात पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा ‘पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम’ मानबिंदू ठरेल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.
‘पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम’ आणि आरोग्य मित्र फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कलाकार श्रीमती माधुरी ओक, आरोग्यमित्र फाउंडेशनचे सदस्य राजीव भावसार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डिजिटल मार्केटिंग हेड प्रा. केतन देसले आदी उपस्थित होते. यावेळी भक्ती, शक्तीचा अनुभव करून देणाऱ्या दोन दर्जेदार कलाकृतींचं सादरीकरण करण्यात आले. चिंचवड येथील साईनाथ बालक मंदिरच्या शिक्षक कलाकारांनी ‘वसा वारीचा’ हे प्रभावी नाट्यवाचन सादर केले. वैभवी तेंडुलकर लिखित आणि दिग्दर्शित या नाट्य वाचनामध्ये स्वाती कुलकर्णी, रेवती नाईक, मानसी कुंभार यांनी सहभाग घेतला होता. तसेच भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. मीनल कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित, भारतीय स्वातंत्र्य युद्धातील वीरांगनांची यशोगाथा सांगणा-या ‘अपराजिता’ हे नृत्यनाट्य सादर करण्यात आले. ज्येष्ठ गायिका संपदा थिटे यांच्यासह चांदणी पांडे, स्वरदा रामतीर्थकर या गायिका आणि कौस्तुभ ओक, प्रवीण ढवळे, अनिरुद्ध जोशी यांच्या दमदार वाद्यवृंदाने वातावरणात देशभक्तीचा नाद घुमवला. डॉ. मिनल कुलकर्णी, कामिनी जोशी, डाॕ. विनया केसकर, डाॕ. सावनी परगी, तेजस्विनी गांधी, सायली रौंधळ, मुक्ता भावसार या कलाकारांनी स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगनांचं दर्शन घडवलं. समारोप प्रसंगी देश सेवेची सार्वजनिक शपथ घेण्यात आली. ध्वनी संयोजन केदार अभ्यंकर यांनी केले.
प्रास्ताविक करताना निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले – कुलकर्णी यांनी सांगितले की, महिला दिन हा केवळ महिलांसाठी मर्यादित न राहता त्याला व्यापक स्वरूप दिले पाहिजे. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ हा पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीसाठी कायमच सक्रिय असेल. यासाठी परिसरातील वेगवेगळ्या विषयातील तज्ञांनी, साहित्यिकांनी, कलाकारांनी इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओला अवश्य संपर्क करावा आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती करावी असेही आवाहन माधुरी ढमाले – कुलकर्णी यांनी केले.
स्वागत केतन देसले, सूत्रसंचालन विद्या राणे, आभार विराज सवाई यांनी मानले.