व्हायोलिनवादक व संगीतकार प्रभाकर जोग यांचं निधन
पुणे – प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचं आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.
प्रभाकर जोग हे संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत राहिले. त्यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.