मिलींदनगरमध्ये दिवसाढवळ्या पाणीचोरी ?
- महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणाचा कळस
- अशा गैरकृत्याला आळा कसा घालणार ?
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाच पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये बेकायदेशीरपणे पाइपलाइनला वेज पाढून प्लास्टीक पाईपद्वारे पाणी भरण्याचा प्रकार आढळून आला आहे. दिवसाढवळ्या नियम धाब्यावर बसवून अशा अवैध मार्गाने पाणी भरण्याचे प्रकार घडत असताना महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग कोणत्या कामात व्यस्त आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या नावाखाली तीन वर्षापूर्वी नागरिकांना दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यातही पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्यानंतर शहराच्या काही भागाला अपुरा पाणी पुरवठा केला जातो. त्यातच दररोज होणारी 35 टक्के पाणी गळती रोखण्यात पाणी पुरवठा विभागाला अपयश आल्याने काही भागातील नागरिक बेकायदेशीर पध्दतीने पाण्याच्या पाईपलाईनला वेज पाडून प्लास्टीकच्या पाईपद्वारे पाणी भरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे पुढील भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
पिंपरीतील मिलींदनगर भागात पालिकेच्या पाईपलाईनला बेकायदेशीर पध्दतीने जळजोड घेऊन पाणी भरले जात आहे. याकडे पाणी पुरवठा विभागाचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे भररस्त्यावर अशा बेकायदेशीर मार्गाने पाणी भरणाऱ्या नागरिकांना कशाचेही भय नाही. गैरमार्गाने नियम धाब्यावर बसवून आपण पाण्याची चोरी करत असल्याचा साक्षात्कार या नागरिकांना कधी होणार?. पालिकेने अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात विदारक परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.