“लेहराएगा तिरंगा’ गीताचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

  • पिंपरीतील दिग्दर्शक भोसले यांना शुभेच्छापत्र
  • सर्वच कलाकारांची घेतली दखल

पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – राष्ट्रभक्तीपर गीतातून शाळाबाह्य मुले आणि बालकामगार यांचे जीवन कथीत करणाऱ्या सीए अरवींद भोसले दिग्दर्शीत लेहराएगा तिरंगा गीताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. गीत रचनाकार, संगीतकार, गायक, स्टुडिओ संचालक सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

लेहराएगा तिरंगा व निशाण लघुपटाद्वारे शाळाबाह्य मुले, बालकामगार यांच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. शहरांमध्ये अनेक ठिकाणी काम करणारे बालमजूर व शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात आणले जाते. दारिद्य्राने पिचलेली अवस्था असतानाही त्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीची ओढ या गीताच्या व लघुपटाच्या माध्यमातून प्रदर्शीत करण्यात आली आहे. बालमजूर कायदा व शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा संदेश गीत व लघुपटाद्वारे देण्याचा प्रयत्न भोसली यांनी केला आहे. तो समाजमनावर छाप टाकत असल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्या या नवनिर्मितीचे कौतुक होत आहे.

या गाण्यात पिंपरीतील नेहरूनगर, विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्पातील मुलांनी कॅमेऱ्यासमोर अभिनय केला. आशिष नाटेकर या बाल कलाकाराने मुख्य भूमिका साकारली. सह बालकलाकार म्हणून गौरव कदम, ओवी दैठे, कुणाल गायकवाड, वेदांत डोंगरे, कुमार अवचर, संतोष सगुंडे, कार्तिक जेगरी, अवनिश नाणेकर यांनी केले. तर, लेहराएगा तिरंगा गीताची रचना अरविंद भोसले, गायन आशिष कुलकर्णी, स्टुडिओ संचालक श्रेयश देशपांडे, संचालिका प्रज्ञा पाटील यांनी केले. या सर्वांच्या कार्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांनी शुभेच्छांचे पत्र पाठवून सीए भोसले यांच्यासह सर्व कलाकारांचे कौतुक केले आहे.

भोसले यांचा गौरव सोहळा

सोशिओ कॉर्प इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित सीएसआर चित्रपट महोत्सवात रेडबड मोशन पिक्‍चर्स दिग्दर्शित निशाण लघुपट व लेहराएगा तिरंगा या देशभक्तीपर गीताला सर्वोत्कृष्ट गीत व लघुपट म्हणून पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते लेखक व दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. सोशिओ कॉर्प इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चेतन गांधी, संचालिका सरस्वती मेहता, बाळासाहेब झरेकर, सतीश कोंढाळकर, विजय कुलकर्णी, संगीतकार श्रेयस देशपांडे, अभिनेत्री प्रज्ञा पाटील, अभिनेता रोहीत पवार, नेहा नाणेकर, योगेश कावली उपस्थित होते. महोत्सवासाठी सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक विषयावरील तब्बल 52 चित्रपटांनी सहभाग नोंदविला.

Share to