नेत्यांच्या दौऱ्याने वाळवा शिराळ्यात भाजपा सक्षम होणार का ?

  • पक्ष संघटनेकडे होतेय दुर्लक्ष

प्रदीप लोखंडे : सांगली

वाळवा शिराळा तालुक्यामध्ये भाजपाच्या बड्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. केंद्राबरोबरच राज्यातील मंत्री, पदाधिकारी या तालुक्यात ठाण मांडून बसत आहेत. नेत्यांचे हे दौरे होतीलही. मात्र यामुळे भाजपा पक्ष सक्षम होणार का ? असा खरा प्रश्न उपस्थित आहे. पक्ष बांधणीकडे होणारे दुर्लक्ष, गावागावात कट्टर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा अभाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बलाढ्य आव्हान यामुळे भाजपा सध्या पिछाडीवरच असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा वाळवा शिराळा तालुक्यात आज दौरा आहे. शिराळ्यात मेळावा होणार आहे, तर वाळवा तालुक्यातील पेठ नाका येथे ते युवकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यातून भाजपा पदाधिकाऱ्यांचे मनोबल किती वाढेल, हे अद्याप तरी स्पष्ट सांगता येत नाही. याला कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होय.

वाळवा आणि शिराळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक या तिघांच्या गटाने एकमेकांना मनावर दगड ठेऊन का होईना पण मदत करत भरघोस यश मिळवले आहे. याउलट भाजपाची अवस्था मात्र दयनीय असल्याचे दिसले. दर महिन्याला मंत्र्यांचे डझनभर दौरे होऊनही गावागावात भाजपाला आपल्या हक्काचा उमेदवार आणि पॅनेल सांगणे मुश्किल झाले होते. गेल्या अनेक वर्ष, महिने तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांच्या आगे-मागे करणारे कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पॅनेल मधून निवडणूक लढवून आपली विजयी पताका फडकवताना दिसले. हा निकाल समोर असताना देखील भाजपाचे नेते त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. या निकालाचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यावरून पुढची रणनीती ठरवता येईल. मात्र ग्रामपंचायत चा निकाल असा का लागला, काही गावात अपवाद वगळता भाजपाचे पॅनेल का उभे राहिले नाही, याचा विचार करून पक्षाने पुढील धोरणे आखणे गरजेचे आहे. तरच येणाऱ्या निवडणुकीत भाजपा आपले कमळ फुलविण्याची शक्यता आहे.

अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात तसे, बडे नेते येतील, दौरे करतील, तालुक्यातील मतदार त्यांचे ऐकूनही घेतील, मात्र पक्ष संघटना, सच्चा कार्यकर्ता नसेल तर मत मात्र ज्याला द्यायचे त्यालाच देतील, अशी अवस्था भाजपाची होईल.

भाजपाची मदार महाडिकांवर

सध्या वाळवा तालुक्यात भाजपाची मदार राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक या महाडिक बंधूंवर आहे. महाडिक यांची वैयक्तिक स्वतःची ताकद आहे. त्यांची यंत्रणा नीटनेटकी आणि सूत्रबद्ध काम करत आहे. मात्र त्यांच्या जोडीला भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल्यास महाडिक यांच्या रूपाने तालुक्याला आमदार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्यजित देशमुखांनी संपर्क वाढविणे गरजेचे

शिराळा तालुक्यात माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे बोट धरून सत्यजित देशमुख भाजपात दाखल झाले. मात्र सध्या माजी आमदार नाईक हेच राष्ट्रवादीत गेल्याने सत्यजित देशमुख या तालुक्यात एकाकी पडले आहेत. भाजपाकडून त्यांना ताकद दिली जात आहे. मात्र त्यांनी आपली ठराविक हक्काची गावे वगळता इतर गावात दौरे करून कार्यकर्त्यांची फळी उभारणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यावर राज्य सरकारकडे पाठपुरावा करत मात करणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे शिराळा तालुक्यात भाजपा उभारी घेत नसल्याचे चित्र आहे.

  • प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
  • मो. नं : 7350266967
Share to