पालिकेकडे एच 3, एन 2 च्या लसींचा साठाच नाही, गरोदर माता, अति जोखमी आजारांच्या रुग्णांमध्ये चिंता

पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – एच 3, एन 2 आजाराचा विळखा वाढत असताना त्याला आळा घालणाऱ्या लसींचा साठाच पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे उपलब्ध नाही. शासनाकडे पाठपुरावा करण्यात महापालिका प्रशासनामध्ये उदासीनता दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून देखील हा पुरवठाच केला नाही. परिणामी शहरातील गरोदर माता, अति जोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये चिंता वाढत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एच 3, एन 2 च्या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात या आजाराने एक रुग्ण देखील दगावला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी लसीकरण करणे आवश्‍यक आहे. शासनस्तरावरून देखील लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात गरोदर माता आणि अति जोखमीचे आजार असणाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

एच 3, एन 2 या आजाराचा विळखा रोखण्यासाठी एच 1 एन 1 (स्वाईन फ्लू)ची प्रतिबंधक लस दिली जाते. त्याचा पुरेसा साठा महापालिकेकडे असणे गरजेचे होते. मात्र या लसींचा साठाच महापालिकेकडे उलब्ध नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आधीच हा साठा मागविणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

एच 3, एन 2 या आजाराचा विळखा रोखण्यासाठी एच 1 एन 1 (स्वाईन फ्लू)ची लस दिली जाते. शासनाकडून गरोदर माता आणि अति जोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांना ही लस देण्याची सूचना दिली आहे. सध्या तरी ही लस उपलब्ध नाही. शासनाकडे पाठपुरावा करून त्याबाबत मागणी करण्यात येईल. या आजाराचा सध्या तरी कमी प्रभाव जाणवत आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक वैद्यकीय अधिकारी.

Share to