पवना प्रगती पॅनेल निवडणूक मैदानात

पिंपरी, दि. 27 (प्रतिनिधी) – पवना सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढविण्यासाठी पवना प्रगती पॅनल तयार करण्यात आला असून आठ उमेदवार मैदानात उतरणार आहेत. आजपर्यंत ज्यांनी विश्‍वासघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांना धडा शिकविण्याची उमेदवारांनी कंबर कसली आहे. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या माध्यस्तीने पॅनेलमधील अंतर्गत नाराजीवर तोडगा काढून हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक लढण्यासंदर्भात अंतर्गत हेवेदावे मिटवण्यासाठी आज रविवारी (दि. 26) भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी आठ उमेदवारांची बैठक झाली. कोणत्याही प्रकारचा विरोध न करता बॅंकेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध व्हावी, असे म्हणणे भाईर यांचे होते. त्यावर सर्वांनी त्यांचा निर्णय मान्य केला होता. मात्र, माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची रचना करताना आम्हाला विचारात घेतले गेले नसल्याची नाराजी काहींनी व्यक्त केली. त्यामुळे आता सर्वांनी बॅंकेची ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. भोईर यांनी सुध्दा निवडणूक लढविण्याची विनंती इतर उमेदवारांनी केली. ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली.

गेल्या कित्येक वर्षांपासून संचालक मंडळातील काही संचालकांकडून आम्हाला विश्‍वासात घेतले नसल्याची भावना व्यक्त करत आठ उमेदवारांनी पवना प्रगती पॅनेलची घोषणा केली. या पॅनेलच्या प्रचारप्रमुख व प्रवक्ता पदी अमर कापसे यांची निवड करण्यात आली. पॅनेलमध्ये सर्वसाधारण पुरुष गटात अमर कापसे, विलास भोईर, दिलीप नाणेकर, दत्तात्रय दातीर पाटील, महिला सर्वसाधारण गटात योगिता कलापुरे, नमिता तपकीर, भटक्‍या विमुक्त जाती गटात वैभव कुऱ्हाडे व अनुसुचित जाती जमाती गटात चंद्रकांत कांबळे या उमेदवारांचा सहभाग आहे. बैठकीत सामाजिक कायर्कर्ते रमेश वाघेरे व ज्येष्ठ नेते अशोक काळभोर यांनी मार्गदर्शन केले.

Share to