पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू करा, जनसंवादमध्ये नागरिकांची मागणी
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, नदी प्रदूषण विषयक समस्या, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसवणे, रस्त्यांमधील तुटलेले चेंबर्स बदलणे व इतर वाहिन्यांची दुरुस्ती करणे, पाणी पुरवठा सुरळीत करणे, रस्त्याचे डांबरीकरण करावे, ज्या भागात पाणी साचते तेथील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, दशक्रिया घाटाची दुरुस्ती करावी आदी तक्रारी वजा सूचना सोमवार (दि.27) जनसंवाद सभेमध्ये करण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवादातून तक्रारीचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे 49 तक्रारी आणि सूचना नागरिकांकडून प्राप्त झाल्या. जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासनाचा थेट संवादात्मक समन्वय आल्यामुळे तक्रारींचे तात्काळ निराकरण होण्यास जनसंवाद सभा प्रभावी माध्यम ठरली असून लोकसहभागातून नागरिकांचे प्रश्न सुटत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.