शास्तीचा मुळ कर भरण्याची मुदत वाढवा, शिवसेनेची मागणी
– शिवसेना उद्योग सेनेचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – आर्थिक वर्ष संपत असल्याने उद्योजकांना आपली इतर कामे करून द्यावी लागत आहेत. त्यामध्येच शास्तीचा मूळ कर भरणा करण्याची मुदत कमी आहे. शास्तीकराचा मूळ कर भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्योग सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
या वेळी युवा सेनेचे अध्यक्ष विश्वजीत बारणे, उद्योग सेनेचे अध्यक्ष कार्तिक गोवर्धंन, उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, मंगेश साठे, सह समन्वयक सचिन बोधणी आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील नागरिकांनी शास्ती माफीसाठी मूळ कर भरला आहे. सवलतींचा मुळ कर भरण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे. मार्च महिना असल्याने उद्योजकांना व कारखानदारांना महिना अखेरचे काम संपवायचे असते. मिळकत कर देखील भरायचा असतो. शास्ती करावरचा मुळ कर भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.