बेडगगाव प्रकरणी तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र आंदोलकांच्या पाठीशी : डॉ.भारत पाटणकर

  • पुरोगामी संघटनांचा सांगलीतील पत्रकार परिषदेत इशारा

सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील बेडग गावात परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बांधलेली कमान अचानक प्रशासनाने पाडली आहे. याबाबत स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू होती. मात्र कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर बौद्ध समाजातील ग्रामस्थांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातली इतिहासातील पहिलीच ही घटना आहे. अतीव दुःख असल्याशिवाय हे घडणार नाही. यावर तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र या आंदोलकांच्या पाठीशी उभा करू, असा इशारा सर्व पुरोगामी संघटनांकडून देऊ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी ॲड. सुभाष पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, धनाजी गुरव, बाबुराव गुरव, ज्योती अदाटे, दिगंबर कांबळे , विकास मगदूम, गौतम काटकर, सुरेश दुधगावकर, किरण कांबळे, डॉ.रवींद्र श्रावस्थी, डॉ.संपत गायकवाड, डॉ.संजय पाटील आदींसह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ.पाटणकर म्हणाले, ” बेडग गावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पोलीस सुरक्षेत पाडून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला गाव राहील नाही, सगळ्या घरांना कुलूप लावून गावाबाहेर पडण्याचा निर्णय भीम अनुयायांनी घेतला, ही बाब गंभीर आहे. २००२ साली ग्रामपंचायतीने ठराव घेऊन परवानगी दिली आहे. पुन्हा २००८ साली लोकवर्गणीतून हे काम पूर्ण करण्याचा परवाना दिला. त्यानंतर ३ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा जागा निश्चित करून परवानगी दिली आहे. त्यानंतर हे बांधकाम सुरू झाले, याला कोणीही गावातील लोकांनी विरोध केला नाही. मात्र अचानक अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने येऊन ही पूर्ण झालेली कमान पाडली, त्याविरोधात आता बेडग गावातील बौद्ध समाजातील लोकांनी आम्हाला कोणी वाली नाही, म्हणून मंत्रालयाकडे लॉंग मार्च काढून कूच केली आहे.

गावातील लोक विरोध करत नाहीत. पण साथ मिळत नसल्याने गाव सोडण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. गावागावात शोषित समाज आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पुरोगामी संघटना आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी आहोत, अधिकारी व प्रशासनाला, तसेच विधिमंडळातील जबाबदार सदस्यांना याबाबत जाब विचाण्यासाठी प्रयत्न करू.” असेही डॉ. पाटणकर म्हणाले.

आंदोलकांनी मंत्रालयात जाणारच ही भुमीका घेऊ नये. मंत्रालयात शिष्ट मंडळ जावून याबाबत चर्चा होऊ शकते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी यांना देखील बैठक बोलवण्याची विनंती केली आहे. त्यांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे सचिन कांबळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला बोलावलं असेही ते म्हणाले.

धनाजी गुरव म्हणाले, ” बेकायदेशीरपणे कारवाई केली आहे. त्यामुळे अधिकारी जबाबदार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. लोकांचा विरोध नाही, मात्र काही लोक जाती-जातीत भांडण लावण्याचा उद्योग करीत आहेत, हे आम्ही होऊ देणार नाही.”


बाबुराव गुरव म्हणाले, ” चार वेळा गावाने परवानगी दिली. ज्यावेळी काम सुरू होते, त्यावेळी गाव आणि प्रशासन बघत होते. मात्र अचानक काम पूर्णत्वास येण्यापूर्वी ही कमान पाडण्याचे आदेश कोणी दिले, याची चौकशी करावी. जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री मिरज विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी आहेत, ते लक्ष का गालत नाहीत, याचा अर्थ काय समजायचा, गावे पेटली पाहिजेत अशीच भूमिका आहे का ?, हे स्पष्ट व्हावा. चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा करा. पाडलेल्या कमणीची भरपाई करून ती पुन्हा बांधावी ” असे गुरव म्हणाले.

————————––-

  • प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
  • मो. नं – 7350266967

Share to