ठाणे महापालिकेच्या धर्तीवर शहरातील गणेश मंडळांचे मंडप शुल्क माफ करा
- माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांची आयुक्तांकडे मागणी…
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- गणेशोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. उत्सवासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून किंबहुना परदेशातूनही नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत कमानी व रनिंग मंडप उभारण्यात येतात. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शुल्क आकारत असून ते माफ करावे, अशी मागणी माजी उपमहापौर शैलजाताई अविनाश मोरे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील गणेशोत्सव हा नागरिकांचा उत्सव असून यामध्ये कोणाचाही स्वार्थ नसतो. उत्सवात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा फार मोलाचा वाटा असतो. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येऊ नये, असा निर्णय झाला आहे. याची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात तत्काळ व्हावी.
ठाणे महापालिकेत या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी गणेश मंडळांकडून मंडप भाडे व अनामत रक्कम माफ करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत. गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी शहरामध्ये ठीक ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक त्या परवानग्या विनाविलंब घेता याव्यात, यासाठी प्रभाग समितीनिहाय व्यवस्था करावी. असे या निवेदनात शैलजाताई मोरे यांनी म्हटले आहे.