नवीन भोसरी उपविभागामुळे वीज ग्राहकांची समस्येतून सुटका, प्रशासकीय कामकाज होणार गतिमान

  • शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या पाठपुराव्याला यश
  • सांगवी आणि चाकण सबडिव्हीजनच्या निर्मितीसाठी राहणार प्रयत्नशील

पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :– महावितरणच्या भोसरी विभागातील भोसरी उपविभाग व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन भोसरी उपविभाग-२ ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला आज यश आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वीज समस्या सुटण्यास मोठा हातभार लागणार असून, महावितरणच्या वीज ग्राहकांना विनाखंडित वीज पुरवठा होऊन बत्ती गुल होण्यापासून सुटका मिळणार असल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य आणि शिवसेनेचे चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात महावितरणच्या गणेशखिंड मंडल कार्यालय अंतर्गत पिंपरी व भोसरी अशी दोन वीज वितरण विभागीय कार्यालये कार्यरत होते. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. विजेच्या समस्यांमुळे परिसरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक त्रस्त झाले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व आणि मी राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य या नात्याने लोकप्रतिनिधींकडे मागणी केली. एम.आय.डी.सी परिसरातील वाढत्या औद्योगिकरणामुळे उच्चदाब ग्राहक (HT) आणि शहरातील वाढत्या नागरिकीकरणामुळे मोठ्या प्रामाणावर बांधण्यात येणाऱ्या सहकारी गृहरचना संस्थातील रहिवाश्यांमुळे लघुदाब (LT) ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील दोन लाख ग्राहकांना एक विभागीय कार्यालय यानुसार शहरात तीन वीज वितरण विभागीय कार्यालयाची आवश्यकता आहे. महावितरणच्या भोसरी आणि आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभाग निर्मित करावा, अशी मागणी तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. गिरीश बापट यांच्याकडे आणि तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे २०१६-१७ मध्ये केली होती. वीज अधिकारी, कर्मचारी, कार्यालय यांची पुनर्रचना करणेही आवश्यक आहे, असेही त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर तत्कालीन पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याला यश आले असून महावितरणकडून याबाबत मंगळवारी (दि. १७) परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

नव्याने तयार झालेल्या भोसरी उपविभाग-२ चे कार्यालय व त्या अंतर्गत तीन शाखा कार्यालयांमध्ये एकूण ६९ तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. भोसरी विभागाच्या नव्या रचनेत आता भोसरी उपविभाग-१ मध्ये भोसरी गाव, चऱ्होली, नाशिक रोड शाखा आणि नवनिर्मित भोसरी उपविभाग-२ मध्ये इंद्रायणीनगर (नवनिर्मित), मोशी व स्पाईनसिटी (नवनिर्मित) शाखा तसेच आकुर्डी उपविभागामध्ये चिंचवड, संभाजीनगर व चिखली (नवनिर्मित) शाखा असे प्रत्येकी तीन शाखा कार्यालय राहतील. नव्या भोसरी उपविभाग-२ कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या चिखली, इंद्रायणीनगर व स्पाईनसिटी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी १९ पदे मंजूर करण्यात आले आहेत, त्यामुळे महावितरणच्या वीज ग्राहकांची वीज समस्येतून सुटका होईल. तसेच प्रशासकीय कामकाजात देखील गतिमानता येऊन महावितरणाचा कारभार पारदर्शक होईल, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.

भोसरी व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभाग व त्या अंतर्गत तीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी; यासाठी भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनीही पाठपुरावा केला. जुलै २०२३ मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी लक्षवेधीही मांडली होती. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे आभार. आता पिंपरी विभागाचे सांगवी सबडिव्हिजन आणि राजगुरूनगरचे चाकण सबडिव्हीजन यांच्याही शाखा कार्यालयांची निर्मिती व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत.

  • मा. संतोष सौंदणकर –
  • सदस्य, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती-पुणे जिल्हा…
  • शहर संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Share to