बोगस पावतीद्वारे आर्थिक लूट करणार्यांना माथाडी मंडळाचे अभय
- कारवाई करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ ; भीम बटालियन संघटनेचा आरोप
पुणे : प्रतिनिधी
औंध येथील वेस्ट इन मॉलमध्ये विराज एंटरप्राईजेस बोगस पावती छापून व्यावसायिकांची आर्थिक लूट करत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यास माथाडी मंडळाचे अधिकारी टाळाटाळ करत आहे. सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात असून शासनाच्या निर्णयालाच केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप भीम बटालियन संघटनेकडून केला आहे. तर आम्ही संबंधीत प्रकरणाची चौकशी करू. वरिष्ठांना कळवू असे उडवाउडवीचे उत्तर अधिकार्यांकडून मिळत आहे. त्यामुळे माथाडीमधील बोगस कारभाराला आळा घालणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औंध येथील विराज इंटरप्राईजेसने महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय याचे उल्लंघन केले आहे. वैयक्तिक संघटनेच्या नावाने पावती पुस्तक छापून बेकायदेशररित्या औंध येथील वेस्ट इन मॉल मधील व्यवसायिकांकडून अनधिकृतपणे खंडणी गोळा केली जात आहे. ही बाब भीम बटालियन संघटनेच्या अध्यक्षा आम्रपाली धीवार यांनी माथाडी मंडळाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार मंडळाच्या अधिकार्यांना आहेत. मात्र त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
अद्याप सदरील बोगस पावती छापून खंडणी गोळा करणार्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. संबंधीतांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. खोटे बनावट दस्त बनवल्या प्रकरणी फोर्जरी दाखल करण्यात यावी. तसेच व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे पैसे मागितल्याप्रकरणी खंडणीचे गुन्हे तत्काळ दाखल करण्यात यावे, असे निवेदन संघटनेकडून वारंवार देण्यात आले आहे. एक दिवस आंदोलन देखील करण्यात आले आहे. मात्र गुन्हा नोंद करायला अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याची दखल घेऊन कारवाई करणार का, असा प्रश्न संघटनेकडून उपस्थित होत आहे.
या बाबत कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत. कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंद करायचा, याचा अभ्यास केला जात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया :
विराज इंटरप्राईजेसवर बोगस पावती आणि खंडणी उकळल्याप्रकरणी कारवाईची मागणी अधिकार्यांकडे सातत्याने करत आहे. मात्र त्यांच्याकडून महिना लोटूनही दुर्लक्ष होत आहे. अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे. त्या विरोधात एकदा आंदोलन छेडले आहे. या बाबत दखल न घेतल्यास पुन्हा संबंधीत कार्यालयावर उपोषण करणार आहे.
– आम्रपाली धीवार, अध्यक्षा, भीम बटालियन संघटना, पुणे.
कोट :
संबंधीत संघटनेचे पत्र आले आहे. निरिक्षक आणि लिपिकांची समिती केली आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होईल. या बरोबरच सर्व कायदेशीर बाबी तपासून घेत आहोत. कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा हे पाहून कारवाईची प्रक्रिया केली जाणार आहे.