संविधानामुळेच जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख – सौ. अनिताताई काटे

पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२३) :-  प्रत्येक भारतीय दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन पूर्ण उत्साहात साजरा करतो. ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे, तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या ३०८ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला. थोर वीरांचे बलिदान आणि त्यागामुळे वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींच्या देशात प्रजासत्ताक दिनाला मोठे महत्व आहे. संविधानामुळेच जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला आहे, असे प्रतिपादन चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्षा सौ. अनिताताई काटे यांनी केले.

पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या वतीने देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाची सुरवात झेंडावंदनाने झाली. लयबद्ध आवाजात सर्व विदयार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि झेंडागीत सादर केले. शाळेच्या नृत्यशिक्षिका देवयानी शिंदे यांच्या कल्पनेतून बहारदार नृत्य विद्यार्थीनींनी सादर केले. शाळेच्या संगीत शिक्षक मृणाल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली देशशक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले. इयत्ता १ लीचा विद्यार्थी जसराज गुदा याने भाषण केले. रिया बहारे हिने संस्कृत गीत सादर केले.

या कार्यक्रमास हिमेटोलॉजिस्ट डॉ. संदीप बारटक्के, बालरोगतज्ञ डॉ. अंजली बारटक्के, फिजिओथेरपीस्ट डॉ. शिवानी गुप्ता, शाळेचे संस्थापक, अध्यक्ष संदीपशेठ काटे, उपाध्यक्षा सौ. अनिताताई संदीप काटे, संचालिका नीहारा काटे, हीना काटे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय जीवनाचे महत्त्व विशद केले. संदीप काटे, निहारा काटे व हीना काटे यांनीही आपली मनोगतं व्यक्त केली. सूत्रसंचालन विशाखा निकम यांनी तर, प्रफुल्ला नातू यांनी आभारप्रदर्शन केले.

Share to