लिनियर गार्डनच्या देखभाल दुरूस्तीबाबत उपाययोजना करा – नाना काटे

  • आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली मागणी

पिंपरी | महाईन्यूज

पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये वस्तुंची मोडतोड झाली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी लावण्यात आलेली खेळणी मोडून पडली आहेत. गार्डनसाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे 14 वर्षापुढील मुले किंबहुना 18 वर्षापुढील देखील मुले खेळण्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे खेळणी मोडली असून मोबाईल चार्जिंग स्टेशन सुध्दा निकामी झाली आहेत. याकडे लक्ष घालून गार्डनची सुरक्षितता ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.

यासंदर्भात काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पीके चौक व गोविंद यशदा चौक ते स्वराज गार्डन चौकापर्यंत लिनियर गार्डनमध्ये कोकणे चौक येथे इन व पीके चौक येथे आऊट तसेच गोविंद यशदा चौक येथे इन ते स्वराज गार्डन चौक येथे आऊट गेट उभारण्यात यावे. जेणेकरून या उद्यानाची निघा राखता येईल. सध्यस्थितीत या उद्यानामध्ये कोणतीही व्यक्ती कोठूनही प्रवेश करू शकते. तसेच, बाहेर जावू शकते. यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उद्यानांची दुर्दशा होत आहे.

लहान मुलांच्या खेळणी असलेले उपकरणांची देखील मोडतोड झालेली आहे. येथील ओपन जिममध्ये सुद्धा काही उपकरणे बंद स्थितीत व नादुरुस्त आहेत. रात्री या उद्यानामध्ये मनपा तर्फे नेमलेले सुरक्षा रक्षक दिसत नाहीत. त्यामुळे टवाळखोर, जोडपी, काही मध्यपींचा येथे वावर वाढला आहे. त्यांच्या आक्षेपार्ह वागण्यामुळे लगतच्या सोसायटीमधील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाबीचा विचार करता उद्यानाच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असेही काटे यांनी म्हटले आहे.

तसेच, स्मार्ट सिटीअंतर्गत अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट नुसार या उद्यानाचा रस्त्यालगत फुटपाथ, सायकल, ट्रॅकचे काम चालू आहे. त्यामुळे हे उद्यान रोडच्या बाजूने पूर्णपणे ओपेन आहे. पाळीव जनावरे या उद्यानात प्रवेश करतात, व झाडाची नासधूस करतात. याबाबत देखील उपाययोजना करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने काटेरी तारेचे कुंपण घालण्यात यावे. या उद्यानामध्ये रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करण्यात यावी. कोकणे चौक येथे माळी कामगारांसाठी साहित्य ठेवण्यासाठी एक खोली बांधण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

Share to