शहरातील खेळाला जागतीक स्तरावर नेण्यासाठी आदर्श क्रीडा धोरण – सभापती उत्तम केंदळे
पिंपरी | महाईन्यूज
शहरातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळापर्यंत नेण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श क्रीडा धोरणाची आखणी करण्यात आली असल्याची माहिती क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाची बैठक नुकतीच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त यांच्या दालनात संपन्न झाली यावेळी केंदळे बोलत होते. यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.
क्रीडा विभागाच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये क्रीडा विषयक पायाभूत सुविधा व खेळाडू घडवण्यासाठी मगर स्टेडियम येथे स्वतंत्र क्रीडा विभाग कार्यालय बांधण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार (खेळाडू, दिव्यांग खेळाडू व मार्गदर्शक) २०२१ क्रीडा पुरस्कार धोरण मसुदा तयार करण्यात आल्यामुळे देशातील राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय खेळाडू असो त्याला महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे. भालाफेकीत जागतिक विक्रम करणा-या नीरज चोप्रा सारख्या खेळाडूला ही पुरस्कार मिळू शकतो त्यामुळे शहरातील खेळाडूंना एक ऊर्जा निर्माण होणार आहे. कबड्डी व्यवसायिक संघ (महिला व पुरुष) तयार करण्याचे धोरण कार्यान्वित करण्यात येणार आहे. ठाणे येथील अभ्यासिकेचा अभ्यास करून व पाहणी अहवाल बघून स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे धोरण तयार करून त्याचा अंतर्भाव क्रिडा विभागामध्ये मध्ये करण्यात येणार आहे. व्यायामशाळा सेवाशुल्क तत्वावर देण्याऐवजी व्यायाम शुल्क दरात वाढ करून व्यायामशाळा पाच वर्षे भाडे कराराने चालविण्यास देण्यासाठी सि.टी. ओ. कार्यालयाच्या सहकार्याने धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती केंदळे यांनी दिली.
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे नियोजन ११ ते २२ डिसेंबर २०२१ या दहा दिवसाच्या दरम्यान करण्यात आलेले आहे. येणा-या सहा महिन्यात मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये देशातील ३० संघ सहभागी होणार आहेत.जलतरण तलाव चालू व अद्यावत करण्यात येणार आहेत. दोन वर्षापासून स्पर्धा झालेल्या नाहीत त्यामुळे दोन महिन्यात महापौर चषक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या खेळ सुविधा कार्यक्षमतेने चालू करून खेळाडू तयार करण्यात येणार आहेत. संगीत अकादमी मार्फत आमंत्रित करण्यात येणार्या नामांकित कलाकारांच्या मानधनात वाढ करून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. पाच ते सहा ध्येय समोर ठेवून पाच वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तज्ञ, कोच, प्रशिक्षक यांच्याद्वारे शहरातील खेळाडूंना उत्तम प्रकारे घडवण्याचं काम होणार आहे. मैदानाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या मैदानावर सुरक्षा व्यवस्थेकरीता रखवालदार निवास तयार करून निवासी रखवालदाराची नियुक्ती करण्याच्या सूचनाही केंदळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आयुक्त राजेश पाटील यांनी क्रीडा अधिका-यांना क्रीडा धोरणाबाबत आखणी करावी, त्याचे नियोजन करावे आणि खेळाविषयी असलेले प्रश्न मार्गी लावावे, अशा सूचना दिल्या.