‘हिवाळी अधिवेशनात बड्या लोकांची नावे समोर येणार’, नवाब मलिक यांचा भाजपला इशारा
मुंबई – मंत्री नवाब मलिक यांनी आता भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असून अनेक बड्या लोकांची नावं समोर येतील. अधिवेशनानंतर त्यांना तोंड लपवायला सुध्दा जागा मिळणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्याबद्दल आज पत्रकार परिषदेत मलिक यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर १०० कोटींची माझी पात्रता तरी आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझी सर्व संपत्ती विकली तरी १०० कोटी मिळणार नाहीत. माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे. माझं कुटुंब आजही भंगाराच्या व्यवसायात आहे. तुम्ही आजही तिथे जाऊ शकता. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, असं मलिक म्हणाले.
मोहित कंबोज यांच्यासह भाजप नेत्यांवर मलिक यांनी जोरदार निशाणा साधला. माझ्यावर कधी सोने तस्करीचे आरोप झाले नाहीत. मुख्यमंत्री निधीत जमा केलेला माझा चेक कधी बाऊन्स झाला नाही. माझ्या घरावर कधी सीबीआयचे छापे पडले नाहीत. कोणत्याही बँकेच्या पैशांवर मी कधीच डल्ला मारला नाही, असं म्हणत मलिक यांनी कंबोज यांच्यावर हल्ला चढवला.