श्री दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यंदा साकारणार ‘श्री पंचकेदार मंदिर’ची प्रतिकृती

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने यंदा 130 वा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी मंडळाचे बाप्पा “श्री पंचकेदार मंदिर’ साकारण्यात येणार आहे. करोनाचे सावट कमी झाल्याने यंदा उत्साहात परंतु सरकारच्या नियमाच्या अधीन राहून उत्सव साजरा करणार असल्याचे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

करोनामुळे आणि केंद्र, राज्य सरकारच्या नियमामुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच “श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, यावर्षी कोतवाल चावडी येथील उत्सवमंडपात “श्रीं’ची मूर्ती विराजमान होणार आहे. यंदा बाप्पांसाठी “श्री पंचकेदार मंदिरा’ची प्रतिकृती बनवण्यात येणार आहे. या प्रतिकृतीच्या सजावटीच्या कामाचा शुभारंभ बुधवारी शिल्पकार विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांच्या हस्ते सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे पार पडला. हे हिमालयाच्या सानिध्यात असलेले शिवशंकराचे अधिष्ठान असलेले मंदिर आहे. प्रत्यक्ष शिवाचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा हा समूह “पंचकेदार मंदिर’ या नावाने प्रसिद्ध आहे. ही पाच शिव मंदिरे उत्तराखंडमधील गवाल येथे स्थित असून, शिवशंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्‍वर आणि काल्पेश्‍वर या नावांनी प्रसिद्ध आहेत. पंचकेदार मंदिर म्हणजे पाच सुवर्णी शिखरांचे असून, हिमालयातील मंदिर स्थापत्य कलेचा एक सुंदर नमुना आहे.

या मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 100 फूट लांब, 50 फूट रंद आणि 81 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवेदेखील बसवण्यात येणार आहेत. सजावट विभागात 40 कारागीर दिवस-रात्र कार्यरत राहणार आहे. त्यानंतर राजस्थानमधील कारागिर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येणार असून, यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने दर्शन घेणे शक्‍य होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

Share to